जिल्हा

ठामपा शाळांमधील दहावीच्या 'टॉपर्स'सोबत आयुक्तांचा सुसंवाद

ठामपा शाळांमधील दहावीच्या 'टॉपर्स'सोबत आयुक्तांचा सुसंवाद
ठामपा शाळांमधील दहावीच्या 'टॉपर्स'सोबत आयुक्तांचा सुसंवाद फोटो: ठाणे वैभव
ठाणे: दहावीनंतर पुढे काय करणार.. कोणत्या शाखेत प्रवेश घेणार.., पुढे कोणत्या क्षेत्रात करियर करायला आवडेल या सोबतच भविष्यात काय व्हायला आवडेल अशा या आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नांना इंजिनीयर.., डॉक्टर.., प्रोफेसर.. पोलीस तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणार अशी उत्तरे देत विद्यार्थ्यांनी देखील महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचेसोबत मनमोकळा संवाद साधला. ठाणे महापालिका शाळांमधील सर्वाधिक गुण प्राप्त केलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नुकताच महापालिकेतील कै. अरविंद पेंडसे सभागृहात आयोजित करण्यात आला होता. दहावीच्या परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या सुफयान अन्सारी (91 टक्के- शाळा क्र. 11, मुंब्रा), सॉलेहा शेख (90.60 टक्के, शाळा क्र. 11 मुंब्रा), प्राची गायकवाड (88.60 टक्के, शाळा क्र. 07 मानपाडा), समिक्षा वाजे (88.40 टक्के, शाळा क्र. 15 किसननगर), बुशरा शेख (88.00 टक्के शाळा क्र. 13, कौसा) या विद्यार्थ्यांचा गौरव आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला. साधारणत: आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी ठामपा शाळेत शिक्षण घेत असतात. शालेय जीवनानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या करिअरची दिशा ठरणार असते, अशा वेळी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन होणे गरजेचे आहे या हेतूने या विद्यार्थ्यांशी आयुक्तांनी संवाद साधला. शाळेबद्दल काय वाटते, शाळेबद्दलचा अनुभव कसा होता? या आयुक्तांनी विचारलेल्या प्रश्नाला शाळा आवडते, शाळेतील सर्वच विषयांचे शिक्षक अभ्यासाच्या बाबतीत शंकाचे निरसन करत होते. अगदी परीक्षेच्या दिवशी सुद्धा सकाळी शिक्षकांनी व्ह‍िडीओ कॉलच्या माध्यमातून अडलेले गणित समजावून सांगितले. त्यामुळे शाळेचे शिक्षक हे कायमच पाठीशी राहिले, शाळा क्र. 15 मध्ये विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरच्या माध्यमातून शिक्षकांनी शिकविले असल्याचे समिक्षा वाजे हिने सांगितले. तर शाळेत कोणत्याही गोष्टी न आवडणाऱ्या नव्हत्या त्यामुळे शाळा आवडत असल्याचे प्राची गायकवाड हिने सांगितले. तर उर्दु शाळेतून दहावी उत्तीर्ण झालेल्या बुशरा शेख, सॉलेहा शेख व सुफयान अन्सारी यांनी देखील शाळेतील अनुभव सांगितले. उर्दु शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्याचे त्यांनी आयुक्तांना सांगितले. ऑनलाईन अभ्यास करता का?, कसा करता? या प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी मोबाईलवर करतो असे उत्तर दिले. मग मोबाईल कोणाचा वापरता ? बाबांचा, आईचा मोबाईल वापरतो असे उत्तर विद्यार्थ्यानी दिले. मोबाईलवर काय पाहता असा प्रश्न त्यांना आयुक्तांनी विचारला असता यूट्यूबवर अभ्यासाशी संबंधित गोष्टी, तसेच सिनेमा पाहत असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. मनमोकळेपणाने रंगलेल्या या गप्पांमध्ये गुगलचा वापर करता का? आदी तंत्रज्ञानाबाबत आयुक्तांनी चर्चा केली. तसेच शास्त्रज्ञांबद्दल माहिती विचारताच माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची पुस्तके वाचल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. यावेळी आयुक्तांनी पालकांशी संवाद साधला असता, मुले स्वत:च्या पायावर उभी रहावी यासाठी मुलांना शिकवण्यासाठी सर्व सहकार्य करणार असे पालकांनी असल्याचे सांगितले. मुलांच्या कौतुकाबरोबरच मुलांच्या पालकांना पुष्पगुच्छ देवून त्यांचा सन्मान करण्यात आला, तर मुलांना पुस्तके, पेन व लॅपटॉप देण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना केवळ संधीचा अभाव असल्यामुळे आपल्या कर्तृत्वाला साजेसे यश मिळवता येत नाही. गुणवंताच्या बाबत अशी बाब घडू नये यासाठी मनपा शाळेतील पाच गुणवंत विद्यार्थ्यांना सीएसआरच्या माध्यमातून लॅपटॉप देण्याचा निर्णय आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला व त्याची यावर्षीपासून सुरूवात झाली. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त १ संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 संजय हेरवाडे, बँक ऑफ महाराष्ट्रचे उपमहाप्रबंधक राजकिशोर रणजीत तसेच शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व पालक उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475