जिल्हा
अंबरनाथमध्ये साफसफाईचा बोजवारा, उबाठाचा आंदोलनाचा इशारा
अंबरनाथमध्ये साफसफाईचा बोजवारा, उबाठाचा आंदोलनाचा इशारा
फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: पावसाळा सुरु झाला तरी शहरात योग्य रीतीने साफसफाई होत नसल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे, त्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असून शहरातील प्रत्येक भागात स्वच्छता करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (उबाठा) गटातर्फे नगरपालिका प्रशासनाला देण्यात आला.
अंबरनाथमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसत असून काही भागात कचरा नियमित उचलला जात नाही. तसेच अन्य समस्यांसंदर्भात शिवसेना उबाठा गटातर्फे मंगळवार २४ जून रोजी शहरप्रमुख ॲड. संदीप पगारे तसेच महिला जिल्हा संघटक आणि माजी उपनगराध्यक्षा अंजली राऊत, महिला शहर संघटक सोनिया फरकाडे यांच्या शिष्टमंडळाने उप मुख्याधिकारी उमेश राऊत यांची भेट घेतली.
पावसाळा सुरु झाला असूनही एकाही भागातील कचरा उचलण्यासाठी नियमित घंटागाड्या येत नाहीत, त्यामुळे कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे, परिणामी रोगराई वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. मोकाट श्वानांची संख्या बेसुमार वाढली असून नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. नालेसफाई झाली तरी पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्रास होतो. याबाबत त्वरित लक्ष घालून शहरवासियांना दिलासा न दिल्यास नाईलाजाने आंदोलन करण्याचा इशारा पालिका प्रशासनाला देण्यात आला.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475