जिल्हा

महासभेत संघर्षाची बोहनी; चर्चेविना विषयांना मंजुरी

महासभेत संघर्षाची बोहनी; चर्चेविना विषयांना मंजुरी
महासभेत संघर्षाची बोहनी; चर्चेविना विषयांना मंजुरी फोटो: ठाणे वैभव
ठामपा महासभेत शिवसेना-भाजपात जुंपली ठाणे: ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक महायुतीमध्ये लढून सत्तेत एकत्र बसलेल्या भाजप-शिवसेनेत पहिल्याच महासभेत चांगलीच जुंपली. प्रश्नोत्तरे आणि लक्ष्यवेधी घेण्याचा आग्रह भाजपच्या तसेच राष्ट्रावादीच्या नगरसेवकांनी केला परंतु त्यांची मागणी मान्य न करता महापौरांनी महापालिका सचिवांना थेट विषयपत्रिका वाचण्याचे आदेश दिले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरसेवक सभागृहात आक्रमक झाले. तर उपमहापौर कृष्णा पाटील यांनी त्यांचे स्थान सोडून खाली येत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. शुक्रवारी महापौर शर्मिला पिंपळोळकर यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या तहकुब सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभा सुरु झाल्यावर सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेते यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सर्व गट नेत्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी तसेच अर्चना मणेरा यांनी महापौरांना प्रश्नोत्तरे घेण्याची विनंती केली. याचवेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नगरसेवक सुधीर भगत यांनी देखील आपली लक्ष्यवेधी वाचून दाखवावी अशी विनंती केली. परंतु सर्व समितीचे गठन झाल्यानंतर लक्ष्यवेधी आणि प्रश्नोतरे घेतली जातील असे महापौरांनी जाहीर केल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी त्यांच्या मागणीचा पुनरुच्चार केला. त्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मनोहर डुंबरे यांनी सदस्यांच्या मागणीकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे सभागृहात गोंधळ सुरु झाला. या गोंधळात सचिव मनिष जोशी यांनी प्रश्नोत्तरे आणि लक्ष्यवेधी न घेता विषयपत्रिका वाचायला सुरुवात केली. सचिव विषयपत्रिका वाचत असताना भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, मृणाल पेंडसे, नम्रता कोळी, संजय वाघुले यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र सचिव हे विषय वाचतच राहिले आणि या गोंधळामध्येच अवघ्या दहा मिनिटांत पहिली सभा गुंडाळण्यात आली. सत्तेचा लाभ घेणाऱ्या भाजप आणि शिंदे गटामध्ये जोरदार खडाजंगी झालेली यावेळी पाहायला मिळाली. महासभा सत्ताधारी शिंदे गट आणि प्रशासनाने फक्त १० मिनिटांत गुंडाळल्याने भाजपच्या महिला नगरसेवकांनी थेट व्यासपीठावर जात जाब विचारला. आक्रमक नगरसेवकांनी सभागृहाबाहेर प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, ठाणे महापालिकेच्या पहिल्याच महासभेला कलंक लागला असल्याची घोषणा भाजपच्या नगरसेवकांनी भर सभेत दिली. महापौर शर्मिला पिंपळोळकर यांनी सर्व विषय समितीच्या सदस्यांची निवड झाल्यानंतर लक्ष्यवेधी आणि प्रश्नोत्तरे घेतली जातील, असे सांगितले होते. त्यांनी लक्ष्यवेधी किंवा प्रश्नोतरे घेणार नाही, असे कधीच सांगितले नाही. तरी देखिल विरोधकांनी गोंधळ घातला, असे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी सांगितले. शिंदे गटाची मनमानी मुख्यमंत्र्यांना कळविणार-कृष्णा पाटील सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाने प्रशासनाच्या मदतीने बेकायदेशीरपणे विषय मंजूर केले आहेत, हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उपमहापौर कृष्णा पाटील यांनी दिला आहे. आज बहुमताच्या जोरावर मंजूर केलेल्या विषयांना आमचा विरोध असून आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे श्री.पाटील यांनी सांगितले. महापौरांना तसे पत्र दिल्याचेही उपमहापौर श्री. पाटील यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475