जिल्हा

भाजप नगरसेवक झाले फेरीवाले; भर रस्त्यात केली किरकोळ विक्री

भाजप नगरसेवक झाले फेरीवाले; भर रस्त्यात केली किरकोळ विक्री
भाजप नगरसेवक झाले फेरीवाले; भर रस्त्यात केली किरकोळ विक्री फोटो: ठाणे वैभव
ठाण्यात प्रतिकात्मक आंदोलनाची जोरदार चर्चा ठाणे : भर उन्हात आणि भर रस्त्यात जांभळी नाक्यावर भाजप नगरसेवकांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी फेरीवाले बनून हातगाड्या थाटल्या आणि भाज्या, साहित्याची किरकोळ विक्री केली. या बेकायदा फेरीवाल्यांच्या व्यवसायातून रोज लाखोंचा हप्ता मिळत असल्याने फेरीवाल्यांवर ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला. बेकायदा फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांचा खोळंबा, प्रशासनाचे दुर्लक्ष याचा निषेध करत आज भाजपच्या नगरसेवकांनी जांभळी नाका येथे अनोखे प्रतिकात्मक आंदोलन केले. या आंदोलनात नगरसेवक सुनेश जोशी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, नम्रता कोळी, उषा वाघ तसेच जयेंद्र कोळी, विशाल वाघ सहभागी झाले होते. प्रत्येक नगरसेवकाने वेगवेगळ्या भाज्या, सुकी मासळी, फळे अफी साहित्य आणले होते. काहींनी हातगाड्यांवर विक्री केली तर काहींनी रस्त्यावरच बसून फेरीवाल्यांची भूमिका निभावली. या आंदोलनाची जोरदार चर्चा झाली. भाजपाच्या नगरसेवकांनी आंदोलन सुरू करताच जांभळी नाका ते स्टेशन रोडपर्यंतच्या फेरीवाल्यांची पळापळ सुरू झाली. फेरीवाल्यांनी विक्रीचे साहित्य घेऊन मुख्य रस्त्यावरून पलायन केले. तर काही वेळानंतर अतिक्रमण विभागाची गाडीही जांभळी नाक्यावर दाखल झाली. याबाबत 'ठाणेवैभव'शी बोलताना सुनेश जोशी यांनी सांगितले की, बेकायदा फेरीवाल्यांची समस्या गंभीर झाली असून वाहतूक कोंडीबरोबरच ठाणेकरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाला खडबडून जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे ते म्हणाले. महापालिकेने फेरीवाला धोरण तातडीने राबवावे, त्या त्या परिसरात परवानाधारक स्थानिक फेरीवाल्यांनाच व्यवसायाची परवानगी द्यावी, बांग्लादेशी आणि इतर शहरांतून आलेल्या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या असल्याचे सुनेश जोशी यांनी सांगितले. या फेरीवाल्यांवर किरकोळ कारवाई केली जाते. कारवाईची माहिती आधीच मिळत असल्याने कारवाईआधीच फेरीवाले गायब होतात, पथक गेल्यानंतर पुन्हा फेरीवाले रस्त्यावर बसतात. बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या व्यवसायातून रोज लाखोंचा हप्ता मिळत असल्याने ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप सुनेश जोशी यांनी केला. ठाण्यात बेकायदा फेरीवाल्यांचा प्रश्न गंभीर झाला आहे. दररोज कोर्ट नाका ते ठाणे रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवासासाठी दररोज सकाळी व सायंकाळी अर्धा ते पाऊण तास लागतो. काही फेरीवाल्यांकडून दादागिरीही केली जाते. या प्रश्नाकडे नगरसेविका नम्रता कोळी, मृणाल पेंडसे, प्रतिभा मढवी, सुनेश जोशी यांच्यासह नगरसेवकांकडून आवाज उठविला जात होता. तर जांभळी नाका परिसरात बांगलादेशी नागरिकांचाही फेरीवाला म्हणून वावर असल्याचा आरोप नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी केला होता. महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर सातत्याने दोन महासभांमध्ये फेरीवाल्यांविरोधात आवाज उठविण्यात आला. पण पण प्रशासनाकडून थातूर मातूर उत्तरे देण्यात आली होती. महापालिकेच्या बुधवारी झालेल्या महासभेतही फेरीवाल्यांबाबत जोरदार चर्चा झाली होती. मात्र, प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसांत काहीही कारवाई झालेली नसल्याचा आरोप नगरसेवकांनी केला. मुंबईसह इतर भागातून ठाण्यात फेरीवाले येत असून, फुटपाथ व रस्ते बळकावले जातात. आमचा स्थानिक परवानाप्राप्त फेरीवाल्यांना विरोध नसून, बाहेरच्या फेरीवाल्यांविरोधात कारवाईची आवश्यकता नगरसेविकांकडून व्यक्त करण्यात आली. जांभळी नाका परिसरात पोलिसांच्या दोन चौक्या आहेत. मात्र, पोलिसांकडूनही कारवाई होत नाही. या ठिकाणी फेरीवाल्यांकडून हप्ते जमा केले जात असून, हप्ते वसुली करणारा `आका' कोण आहे, असा सवाल या नगरसेविकांनी केला.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475