जिल्हा
बाबासाहेब आंबेडकरांना म्हणावा तसा मान नाही : आव्हाडांची खंत
बाबासाहेब आंबेडकरांना म्हणावा तसा मान नाही : आव्हाडांची खंत
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देशात म्हणावा तितका मान दिला जात नाही, अशी खंत राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) नेते आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.
पक्षातर्फे येथील टाऊन हॉलमध्ये डॉ. आंबेडकर यांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले असून त्याचे उदघाटन 'ठाणेवैभव'चे संपादक मिलिन्द बल्लाळ यांच्या हस्ते झाले.
श्री. बल्लाळ यांनी बाबासाहेबांच्या विचारांचे अनुकरण झाले तरच घटनेचे रक्षण आणि उपेक्षितांचा विकास होईल, असे सांगितले. भारतीय समाजात सर्वसमावेशकता असणे गरजेचे आहे. परंतु प्रचलित राजकारण त्यास बगल देत आहे, असे निरीक्षण श्री.बल्लाळ यांनी नोंदवले. समाज आत्मविश्वास गमावून बसल्याचे अनेकदा जाणवते, कारण तो बाबासाहेबांच्या शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, या मंत्रापासून भरकटला आहे.', असेही श्री. बल्लाळ यांनी स्पष्ट केले.
आ. आव्हाड यांनी घटनेवर होत असलेल्या आघातांबद्दल चिंता व्यक्त केली आणि हे प्रयत्न थांबले नाहीत तर देशाचे तुकडे होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महिलांना मतदानाचा हक्क घटनेने दिला असला तरी मते विकू नका असे सांगणाऱ्या बाबासाहेबांचे मात्र लाडक्या बहिणीने ऐकले नाही, असेही ते म्हणाले. भारताने इराणच्या पाठीशी उभे राहायला पाहजे होते, असेही ते म्हणाले.
सरकार विविध संस्थांच्या माध्यमातून मूलभूत हक्कांची पायमल्ली करीत असून त्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जातो', अशी टीका आ. आव्हाड यांनी केली. शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. विजय कदम यांनी आभार मानले. छायाचित्र प्रदर्शन उद्या सायंकाळपर्यंत खुले राहणार आहे.
300x450
300x600