जिल्हा
मराठी नामफलकांची जबाबदारी सहायक आयुक्तांवर
मराठी नामफलकांची जबाबदारी सहायक आयुक्तांवर
फोटो: ठाणे वैभव
आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश
ठाणे: सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दुकाने आणि आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेत ठळक अक्षरात लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार या नामफलकांची तपासणी आणि कारवाई करण्याची जबाबदारी ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांनी नऊ प्रभाग समित्यांच्या सहायक आयुक्तांवर सोपवली आहे.
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात असलेल्या प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी लिपीतील म्हणजेच मराठी भाषेमध्ये निश्चित केलेल्या आकारापेक्षा लहान असणार नाही, अशाप्रकारे लावणे बंधनकारक आहेत. प्रत्येक आस्थापनेचा नामफलक देवनागरी मराठी भाषेतील जरी असेल तरी त्यावरील अक्षर लेखन हे नामफलकावर सुरुवातीलाच मराठी भाषेत असणे देखील आवश्यक आहे. तसेच मराठी भाषेतील अक्षरांचा टंक हा इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही याची संबंधित सहायक आयुक्तांनी कार्यवाही करताना खबरदारी घ्यावयाची आहे, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले आहे.
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 मधील कलम 36 क नुसार ठामपा क्षेत्रातील जी दुकाने तसेच आस्थापना यांचे नामफलक मराठी देवनागरी भाषेत नसतील अशांवर कारवाई करताना सर्व आवश्यक बाबी तपासून घेण्याच्या सूचनाही सहायक आयुक्तांना देण्यात आल्या आहेत. तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व दुकान मालकांनी व आस्थापनांनी अधिनियमांचे पालन करुन नामफलक मराठी देवनागरी लिपीत करुन घेवून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.
300x450
300x600