११ तास ३४ मिनिटांत अंतर पूर्ण,
डोंबिवली: पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे भागीरथी नदीत खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धा पार पडली. या अत्यंत आव्हानात्मक शर्यतीत १५ वर्षीय युवा जलतरणपटू मास्टर आर्यन राजेश खेडेकर याने उल्लेखनीय कामगिरी केली. तब्बल ८१ किलोमीटरचे अंतर आर्यनने ११ तास ३४ मिनिटांत पूर्ण केले. या शर्यतीसाठी १२ तास ३० मिनिटांचा कट-ऑफ वेळ निश्चित करण्यात आला होता. आर्यनने निर्धारित वेळेच्या आत शर्यत पूर्ण केली.
या कामगिरीसह आर्यनने स्पर्धेत एकूण १०वा क्रमांक मिळवला. महाराष्ट्रातून त्याने द्वितीय क्रमांक पटकावला. अवघ्या १५व्या वर्षी ८१ किलोमीटरची अतिदीर्घ खुल्या पाण्यातील जलतरण शर्यत पूर्ण करणारा सर्वात तरुण मुलगा जलतरणपटू ठरण्याचा मानही त्याने मिळवला आहे.
भागीरथी नदीतील ही शर्यत अत्यंत खडतर मानली जाते. नदीचा प्रवाह आणि बदलती जलस्थिती यामुळे जलतरणपटूंची कसोटी लागते. सलग अनेक तास पाण्यात राहणेही मोठे आव्हान असते. या आव्हानांवर मात करत आर्यनने विलक्षण सहनशक्ती दाखवली. त्याच्या कामगिरीत चिकाटी आणि मानसिक ताकदीचेही दर्शन घडले. आर्यनच्या या यशाबद्दल त्याचे पालक आणि प्रशिक्षकांनी अभिनंदन केले तसेच क्रीडाप्रेमींनी आर्यनला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.