जिल्हा
एपीएमसी बाजार पाण्याने भरले
एपीएमसी बाजार पाण्याने भरले
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: मंगळवारी पहाटेपासूनच मुंबई उपनगरांसह नवी मुंबई शहराला पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच सुरू झालेल्या पावसाच्या संततधारेने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत पाणी साचले होते. फळ बाजार आवारासह प्रवेशद्वारावर पाणीच पाणी भरले होते. त्यामुळे एपीएमसीमधील नालेसफाईची पोलखोल झाली असल्याचा आरोप बाजार घटकांकडून होत आहे.
एपीएमसीमधील बाजार समिती ही मुख्य रस्त्यालगत आहे. मुख्य रस्त्यावरील नाले, गटारेही उंच भागात आहेत, तर बाजार परिसर सखल भागात आहे. फळ बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वारात व परिसरात पाणी साचले होते. एपीएमसी बाजारातील मलनिस्सारण वाहिन्या, चेंबर व्यवस्थित साफ होत नसल्याने बाजार आवारात हे पाणी साचत असल्याचा आरोप होत आहे.
एपीएमसी प्रशासनाकडून बाजार आवारात मान्सूनपूर्व नालेसफाईचा ठेका दिला जातो. त्याचबरोबर त्यात चार महिने नाल्याच्या देखभालीचा समावेश असतो. मात्र ठेकेदारामार्फत एपीएमसी बाजार आवारातील मान्सूनपूर्व नालेसफाई योग्यरीत्या होत नसल्याने बाजारात मे महिन्यातील पहिल्याच पावसात पाणी साचल्याने नालेसफाईच्या कामाची पोलखोल झाली असल्याचा आरोप बाजार घटकांकडून करण्यात आला होता. आता परत एकदा मंगळवारच्या पावसाने बाजार आवारातील नाले सफाईची पोलखोल केली आहे. यावेळी बाजार आवारात पाणी साचल्याने कामगारांना गुडघाभर पाण्यातून वाट काढावी लागली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475