जिल्हा
नवी मुंबईत विकसित करणार एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क
नवी मुंबईत विकसित करणार एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क
फोटो: ठाणे वैभव
नवी मुंबई: सिडकोने पुष्पक नोडमधील चिर्ले गावाजवळ सुमारे ३७४ हेक्टर जमीन एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्क (आयएलपी) विकसित करण्यासाठी राखीव ठेवली आहे. या प्रकल्पांतर्गत विकसित होणाऱ्या क्षेत्रावर आवश्यक पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा, सामायिक सुविधा आणि उपयुक्तता जाळ्यांचा समावेश असेल.
“जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मजबूत प्रादेशिक कनेक्टिव्हिटी यांसारख्या जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह नवी मुंबईचे मोक्याचे स्थान, या बळावर, नवी मुंबई हे लॉजिस्टिक्स व संबंधित उद्योगांसाठी नैसर्गिक केंद्र म्हणून आकार घेत आहे. एकात्मिक लॉजिस्टिक्स पार्कच्या विकासाद्वारे, सिडको कार्यक्षम मालवाहतूक सुलभ करणारी, गुंतवणूक आकर्षित करणारी आणि आर्थिक विकासाला चालना देणारी भविष्याभिमुख परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्राथमिक टप्पा हा या क्षमतेला चालना देत नवी मुंबईला राष्ट्रीय स्तरावरील लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून स्थापित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
या प्रकल्पासाठी जमीन वाटप, विकास आणि वितरण हे महाराष्ट्र शासनाच्या एमआयडीसी पास-थ्रू धोरणानुसार करण्यात येणार आहे. यासाठी सविस्तर मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून संपूर्ण क्षेत्र सात लॉजिस्टिक्स झोनमध्ये विभागण्यात आले आहे. सर्व भूखंडांना सुलभ जोडणी मिळावी यासाठी ४५ मीटर आणि ३० मीटर रुंदीच्या रस्त्यांचे प्राथमिक जाळे प्रस्तावित करण्यात आले आहे.
प्राथमिक टप्प्यात, सिडकोने स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेद्वारे लँड पार्सल एल-१ मधील सुमारे ७२ हेक्टर (१७९.२९ एकर) क्षेत्रातील १२ भूखंडांसाठी स्वारस्य अभिव्यक्ती (EOI) आमंत्रित केली आहे. या प्रकल्पासाठी रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, मलनिस्सारण जाळे आणि पावसाच्या पाण्याचा निचरा यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधा सिडकोकडून विकसित करण्यात येतील.
300x450
300x600