जिल्हा

ज्येष्ठांची काठी होणार 'आधारवड' मोबाईल ॲप

ज्येष्ठांची काठी होणार 'आधारवड' मोबाईल ॲप
ज्येष्ठांची काठी होणार 'आधारवड' मोबाईल ॲप फोटो: ठाणे वैभव
ठाणे: ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठाणे पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेतून विकसित करण्यात आलेल्या 'आधारवड' मोबाईल ॲपला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. कोपरी पोलिस परिसरातील ज्येष्ठांना या ॲपची सविस्तर माहिती देत मार्गदर्शन करत आहेत. या मोहिमेमुळे ज्येष्ठांच्या मनात विश्वास, सुरक्षिततेची जाणीव निर्माण होऊन पोलिस प्रशासनाशी संबंध अधिक दृढ होत आहेत. कोपरी पोलिस परिसरातील ज्येष्ठांना प्रत्यक्ष भेटीगाठी करून ॲपचे महत्त्व पटवून देत मोबाईलवर हा ॲप डाउनलोड करून देण्यात येत आहे, त्याचा वापर कसा करावा हेही शिकविले जात आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा ॲप एकप्रकारे जीवनरक्षक ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठांनी व्यक्त केली. एका क्लिकवर थेट पोलिसांशी संपर्क साधण्याची सुविधा या ॲपमध्ये आहे. आपत्कालीन परिस्थितीत ज्येष्ठ नागरिकांना झटपट मदत मिळण्याची खात्री असून कुटुंबीयांचे व नातेवाईकांचे तातडीचे संपर्क क्रमांक ॲपमध्ये नोंद करण्याची सोय आहे. ठाणे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतील 'आधारवड' मोबाईल ॲप जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोपरी पोलिस ठाण्याच्या या मोहिमेत पोलिस अधिकारी व कर्मचारी स्वतः ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत आहेत. अनेक ज्येष्ठांनी आपल्या मनातील भीती व समस्या व्यक्त केल्या. पोलिसांनी त्या मनापासून ऐकून घेतल्या आणि तत्काळ मार्गदर्शन केले. त्यामुळे 'आधारवड' हा शब्द केवळ मोबाईल ॲपपुरता मर्यादित न राहता खऱ्या अर्थाने पोलिसांचा आधारवड ठरतो आहे, अशी भावना नागरिकांमध्ये उमटली. यावेळी पोलिस उपनिरीक्षक नितीन राऊत, सिताराम गावित, पोलिस हवालदार जितेंद्र खलाटे, दीपक पाटील, करण जवाने आदी विशेष परिश्रम घेत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरक्षिततेचा हात पुढे 'आधारवड' मोबाईल ॲप ठाणे पोलिसांच्या सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण मानले जात आहे. भविष्यात या उपक्रमाचा अधिक व्यापक फायदा सर्व ज्येष्ठांना मिळावा, अशी अपेक्षा आहे, असे कोपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक निशिकांत विश्वकार यांनी सांगितले. या ॲपच्या माध्यमातून पोलिसांनी केवळ सुरक्षेची हमी दिली नाही, तर “तुम्ही एकटे नाही, पोलिस कायम तुमच्या पाठीशी आहेत” असा आश्वासक संदेशही दिला. त्यामुळे एक समाधान, दिलासा आणि विश्वास वाटला, अशा भावना ठाणे पूर्वेतील ज्येष्ठ नागरिक वामन कर्वे यांनी व्यक्त केल्या.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475