जिल्हा
डेंग्यूने तरुणीचा मृत्यू
डेंग्यूने तरुणीचा मृत्यू
फोटो: ठाणे वैभव
भिवंडी: तालुक्यातील टेंभवली-जु-नांदुर्खी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील जुनांदुर्खी जुना गावात डेंग्यूची साथ पसरली असून या आजाराने एका अठरा वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
या ठिकाणी ग्रामीण आरोग्य यंत्रणा कार्यरत असून नियमित तपासण्या सुरु आहे. मात्र या ग्रामपंचायतीमधील इतर पाड्यात व गावात हि साथ नसल्याची माहिती चिंबीपाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय धरणे यांनी दिली.
टेंभवली-जु-नांदुर्खी ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत जुनांदुर्खी येथील जुना गाव, कॉलनी मदरपाडा, शिवाजीनगर, हिरोबा स्टॉप, रायपाडा स्टॉप व खरगोऱ्हा हे भाग असून त्यापैकी जुनागाव येथे डेंग्यूची साथ गेल्या काही दिवसांपासून पसरली आहे.
जुना गावमध्ये राहणारी प्रविणा जाधव (१८) हि आजारी झाल्यानंतर तिला स्थानिक डॉक्टरांकडून उपचार सुरु होते. मात्र आजार नियंत्रणात न आल्याने तिला भिवंडी शहरातील आयुष्य हॉस्पिटल आणि लाईफ लाईन येथे उपचार सुरु असताना डेंग्यूचा आजार असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या मेंदूला सूज येऊन रक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान तिचा १० जून रोजी मध्यरात्रीनंतर तिचा मृत्यू झाला. डेंग्यूचा आजार बळावल्याने तिच्या रक्ताचे नमुने कळवा येथील छत्रपती हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी पाठविल्याचे डॉ. धरणे यांनी सांगितले.
तत्पूर्वी डेंग्यूचा आजाराची माहिती मिळताच टेंभवली आरोग्य उपकेंद्र मार्फत ५ जूनपासून शिबीर लावून नागरिकांच्या रक्ताची तपासणी केली होती. त्यापैकी ३२ नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यातील सहा नमुने संशयित असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.
जुनांदुर्खी गावात स्टेम प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा होत असून सुमारे ८० लाख रुपये बिलाची थकबाकी असल्याने या गावास स्टेम प्राधिकरणाने पाणी कपात केली असल्याने या ग्रामपंचायतीमध्ये पाणी टंचाई असते. त्यामुळे जुनांदुर्खी गावातील नागरिक अल्पवेळेत मिळालेल्या पाण्याचा साठा प्लास्टिक ड्रममध्ये करतात. त्यामुळे ड्रममध्ये डेंग्यूच्या आळ्या, जंतू आणि डास या भागात पसरले आहेत त्यामुळे हा आजार येथे बळावत आहे, अशी माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली.
300x450
300x600