महाराष्ट्र
कृत्रिम फ्लेमिंगोंसाठी पैशांची उधळण; खरे फ्लेमिंगो होणार बेघर
कृत्रिम फ्लेमिंगोंसाठी पैशांची उधळण; खरे फ्लेमिंगो होणार बेघर
फोटो: ठाणे वैभव
३०० हेक्टर पाणथळ जागेवरील आरक्षण सिडकोने उठवले
नवी मुंबई: स्वच्छ भारत अभियान २०२१-२२ मध्ये मनपाने शहरात हजारो कृत्रिम फ्लेमिंगो शहरात बसवून शहराला फ्लेमिंगो सिटी म्हणून नावारूपास आणले. मात्र याच फ्लेमिंगो सिटीतील खऱ्या फ्लेमिंगोंचे वास्तव्य असणाऱ्या ३०० हेक्टर पाणथळ जागेवरील आरक्षण उठवून त्या जागेवर सिमेंटच्या इमारती उभ्या करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मनपाच्या या दुटप्पी भूमिकेचा आणि सिडकोच्या हुकूमशाहीचा पर्यावरण प्रेमींनी विरोध केला असून आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
नवी मुंबई शहराच्या एका बाजूस विस्तीर्ण असा खाडी किनारा पसरला असल्याने या ठिकाणी दरवर्षी लाखोंच्या संख्येने फ्लेमिंगो पक्षी येतात. सुरुवातीला फक्त थंडीच्या काळात येणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांना येथील वातावरणाबरोबर खाद्य मिळू लागल्याने जवळपास ७ ते ८ महिने फ्लेमिंगोंचा मुक्काम या ठिकाणी पडू लागला आहे.
नेरूळ येथील चाणक्य तलाव आणि डिपीएस शाळेच्या शेजारील तलावात यांचा अधिवास मोठ्या संख्येने दिसून येतो. परदेशातून येणाऱ्या या फ्लेमिंगोंना पाहण्यासाठी नवी मुंबईबरोबर मुंबई, ठाणे येथील पक्षीप्रेमी मोठ्या संख्येने येत असतात. मात्र आता ही आरक्षित असलेली पाणथळ जागा संपवण्याचा निर्णय सिडकोने घेतला असून त्यास नवी मुंबई महानगर पालिकेने हिरवा कंदील दिला आहे. जवळपास ३०० हेक्टर पाणथळ जागेवरील आरक्षण उठवून येथे निवासी क्षेत्र उभे राहणार आहे. त्यामुळे एकीकडे शहरात करोडो रुपये खर्च करून कृत्रिम फ्लेमिंगो बसवून शहराला फ्लेमिंगो सिटीची उपाधी देणाऱ्या मनपाने खऱ्या फ्लेमिंगोच्या अधिवास जागेवर मात्र घाला घातला आहे. याला पर्यावरण प्रेमींनी तीव्र विरोध केला आहे.
महानगर पालिकेने पाणथळ जागांचे आरक्षण कायम न ठेवल्यास याबाबत आपण न्यायालयात जावू, असा इशारा पर्यावरण प्रेमी सुनिल अग्रवाल आणि भारत गुप्ता यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475