जिल्हा
ठाण्यात नालेसफाईसाठी रोबोने कंबर कसली
ठाण्यात नालेसफाईसाठी रोबोने कंबर कसली
फोटो: ठाणे वैभव
३८५ किमी नाल्यांची सफाई होणार
ठाणे : यंदा पालिकेने नालेसफाईच्या कामासाठी व्यापक नियोजन सुरू केले असून, शहरातील सुमारे ३८४.९१ किलोमीटर लांबीच्या नाल्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. या कामांसाठी सुमारे ११.५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, मागील वर्षाच्या तुलनेत खर्चात वाढ करण्यात आली आहे. नालेसफाईसाठी रोबोटीक तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे.
महापालिकेच्या घनकचरा विभागामार्फत नऊ प्रभाग समित्यांअंतर्गत मुख्य नाले तसेच उपनाल्यांची सफाई केली जाणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, १५ एप्रिलपर्यंत कार्यादेश देण्यात येतील. त्यानंतर २० एप्रिलपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होईल, अशी माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.
शहरातील काही ठिकाणी रोबोटिक यंत्रणेद्वारे नालेसफाई करण्याचा प्रयोग राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात दहा ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. त्यामुळे मनुष्यबळावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार आहे.
खाडी परिसर असलेल्या कळवा, माजिवाडा-मानपाडा या भागांमध्ये यांत्रिक पद्धतीने नालेसफाई केली जाणार आहे. तसेच कामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असून, संपूर्ण प्रक्रियेचे चित्रीकरणही केले जाणार आहे.
रस्त्यांलगत असलेल्या कल्व्हर्ट्सची सफाई तसेच नाल्यांच्या शेवटच्या टोकांवर साचलेला गाळ काढण्यावरही भर दिला जाणार आहे. अनेकदा नालेसफाई पूर्ण होऊनही शेवटच्या टोकावरील गाळामुळे पाणी साचण्याच्या घटना घडतात. यंदा त्या समस्येवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मागील काही वर्षांत नालेसफाई वेळेत पूर्ण न झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या तसेच अपघातांच्या घटना घडल्या होत्या. यामुळे यंदा वेळेत आणि प्रभावीपणे कामे पूर्ण करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे.
ठाणे पालिका क्षेत्रात लोकमान्य-सावरकरनगरमध्ये ३४, उथळसर ४, वर्तकनगर २९, माजीवाडा-मानपाडा ४४, मुंब्रा ८०, कळवा २०१, दिवा १३१, नौपाडा ४९, वागळे इस्टेट भागात ३८ नाले आहेत.
300x450
300x600