जिल्हा

उल्हास नदीच्या काठी डोणे गावात साकारणार जांभूळ संशोधन केंद्र

उल्हास नदीच्या काठी डोणे गावात साकारणार जांभूळ संशोधन केंद्र
उल्हास नदीच्या काठी डोणे गावात साकारणार जांभूळ संशोधन केंद्र फोटो: ठाणे वैभव
बदलापूर: बदलापूरजवळील वांगणी परिसरातील डोणे गावात उल्हास नदीच्या तीरावर जांभूळ संशोधन केंद्र साकारण्याचा दृष्टीने हालचाली सुरू आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी, जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे विश्वस्त आदित्य गोळे यांच्या समवेत नियोजित जागेची मंगळवारी पाहणी केली. शहरी शेती वनीकरण केंद्र आणि शासकीय कृषी महाविद्यालय उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी, जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे विश्वस्त आदित्य गोळे यांच्या सततच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद दर्शवला. विद्यापीठाच्या निकषांनुसार संशोधनासाठी योग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षभर या प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू असून, त्यानुसार 27 मे 26 रोजी विद्यापीठाच्या सात सदस्यीय उच्चस्तरीय समितीने जागेची पाहणी करून सकारात्मक अहवाल सादर केला होता. त्यानंतर कुलगुरू डॉ. भावे यांनी डोणे येथील जागेची पाहणी केली. जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे मुख्य विश्वस्त आदित्य गोळे यांनी सांगितले की, देशभरात जांभूळाच्या हजारो जाती असूनही त्यावर सखोल संशोधन झालेले नाही. संवर्धन, बीज बँक, कलम बांधणी, सुधारित वाणांची निर्मिती तसेच कमी उंचीची आणि वर्षातून दोनदा फळ देणारी जांभूळ प्रजाती विकसित करण्यासाठी स्वतंत्र संशोधन केंद्राची नितांत गरज असल्याचे जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे विश्वस्त आदित्य गोळे यांनी सांगितले. या सर्व विषयांवर बदलापूरमध्ये काम करण्याबाबत कुलगुरूंनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. ठाणे जिल्ह्यात १९७२ मध्ये कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत विद्यापीठाचे एकही संशोधन अथवा विस्तार केंद्र अस्तित्वात नसल्याने वांगणीतील डोणे गावात प्रस्तावित होत असलेला प्रकल्प जिल्ह्याच्या कृषी विकासासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचे मानले जात आहे. जांभूळ संशोधन केंद्रासोबत शहरी शेती वनीकरण केंद्र आणि शासकीय कृषी महाविद्यालय एकाच ठिकाणी उभारण्यात आल्यास जांभूळाच्या विविध प्रजातींचे संवर्धन, बीज बँक, उती संवर्धन, कलम बांधणी, आधुनिक संशोधन, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि आदिवासी तसेच बागायतदारांसाठी तंत्रज्ञान हस्तांतरण अशा अनेक उपक्रमांना चालना मिळणार आहे. यामुळे परिसरातील कृषी अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. या पाहणी दौऱ्यावेळी बदलापूरच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, ठाणे जिल्हा कृषी अधिकारी, विद्यापीठाचे संचालक भारत वाघमोडे, धनंजय गोळे, आदित्य गोळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475