जिल्हा
नववर्षात ठाणे स्थानकात थांबणार १५ डब्यांच्या लोकल
नववर्षात ठाणे स्थानकात थांबणार १५ डब्यांच्या लोकल
फोटो: ठाणे वैभव
फलाटांची लांबी वाढवण्यास सुरुवात
ठाणे: ठाणे स्थानकातील धिम्या मार्गावर १५ डब्यांची लोकल सेवा सुरु करण्यासाठी फलाटांची लांबी वाढवण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे. त्यामुळे इतकी रोज गर्दीत घुसमटलेले स्थानक नवीन वर्षात मोकळा श्वास घेऊ शकेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ठाणे स्थानकाकडे पहिले जाते. दररोज साडेसहा लाखांहून अधिक प्रवासी या स्थानकातून प्रवास करतात. फलाट क्रमांक दोनवरून कल्याण दिशेने लोकल कर्जत, कसारापर्यंत धावतात. तर फलाट क्रमांक चारवर या मार्गावरून येणारे लोकल छत्रपती शिवाजी महाराज स्थानकापर्यंत पोहचतात. फलाट क्रमांक तीनवरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कसरा, कर्जतपर्यंत लोकल सुटतात. या तिन्ही फलाटांवर सकाळ-संध्याकाळच्या पीक अवरमध्ये पाय ठेवायलाही जागा नसते.
स्थानकातील जलद मार्गावरील फलाटांची लांबी व उंची याआधीच वाढवण्यात आल्याने येथे १५ डब्यांच्या लोकल थांबतात. पण फलाट क्रमाक २, ३ आणि ४ वर १५ डब्यांच्या लोकलसाठी तोकडे भासत आहेत. त्यामुळे या मार्गावर १५ डब्यांची लोकल आल्यास ती दोनवेळा थांबवण्यात येते. त्यामुळे प्रवाशांची त्रेधा उडून अनेकवेळा अपघातांना आमंत्रण मिळते. ही स्थिती सुधारण्यासाठी तसेच भविष्यात धिम्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल सुरू करून प्रवास आरामदायी करण्यासाठी प्रशासनाने फलाट क्रमांक २, ३ आणि ४ यांचे रुंदीकरण व विस्तार करण्याचा निर्णय घेत कामाला सुरुवात केली आहे.
प्लॅटफॉर्म २ ची रुंदी वाढवून १६.१५ मीटर, प्लॅटफॉर्म ३ व ४ चे रुंदीकरण ४० मीटरपर्यंत करण्यात येणार आहे. १५ डब्यांच्या लोकल गाड्यांना थांबण्यासाठी सोय करण्यात येणार असल्याने प्रवाशांच्या चेंगराचेंगरीत व अपघातांत घट होऊ शकते. फलाटांची रुंदी वाढवल्यामुळे लोकलमधील गर्दी देखील विभागली जाणार आहे. प्रवाशांना बसण्यासाठी आणि उभे राहण्यासाठीही पुरेशी जागा मिळेल.
मध्य रेल्वेमार्फत सध्याच्या घडीला २० ते २२ फेर्या १५ डब्यांच्या चालवल्या जात आहेत. यातील बहुतांश लोकल या जलद मार्गावर धावत आहेत. धिम्या मार्गावर विशेषत: फलाट क्रमांक २ आणि ४ वर १५ डब्यांची जलद लोकल आल्यास तिला दोनवेळा थांबा द्यावा लागत आहे. ‘ठाणे स्थानकात दिवसरात्र फलाटांचे रुंदीकरण सुरू आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती मध्ये रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475