उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वच्छ-सुंदर शहर संकल्प
ठाणे : ठाणे शहरासाठी ‘मिशन झिरो गार्बेज’ तातडीने राबविण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. बुधवारी ठाण्यातील आनंद आश्रमात स्व. आनंद दिघे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी श्री.शिंदे आले होते. त्यावेळी त्यांनी ठाणे महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेत सूचना दिल्या.
‘मिशन झिरो गार्बेज’ तातडीने सुरू करून शहरातील कचरा आणि अस्वच्छतेच्या समस्येवर व्यापक पद्धतीने काम करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले. शहरातील गल्लीबोळांपासून प्रमुख रस्त्यांपर्यंत, गटारांपासून नाल्यांपर्यंत प्रत्येक भाग स्वच्छ दिसला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका शिंदे यांनी मांडली. शहराच्या स्वच्छतेसाठी कोणतीही कसर न ठेवता कामाला लागण्याचे निर्देश देतानाच ठाणे स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.