वय वर्षे साडेतीन आणि २८१५ फूट उंचीचा गड!
पडघा : भिवंडी तालुक्यातील पडघ्याजवळील चिराडपाडा गावातील अवघ्या साडेतीन वर्षांच्या उत्कर्षा कारवे या चिमुकलीने आई-वडिलांसोबत ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध माहुली गडाची २८१५ फूट उंचीची चढाई तब्बल चार तासांत पूर्ण केली. पावसाळ्यानंतरचा निसरडा मार्ग, उभे चढ-उतार आणि आव्हानात्मक वाट पार करत उत्कर्षाने कोणताही थकवा न दाखवता उत्साहाने हा ट्रेक पूर्ण केला.
माहुली गड हा सह्याद्रीतील प्रसिद्ध आणि चढाईच्या दृष्टीने आव्हानात्मक किल्ल्यांपैकी एक मानला जातो. अशा कठीण वाटेवर अवघ्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीने आपल्या आई-वडिलांसोबत आत्मविश्वासाने केलेली ही चढाई विशेष कौतुकास्पद ठरली आहे.
उत्कर्षाला सह्याद्रीतील प्रसिद्ध ट्रेकर आणि विश्वविक्रमवीर शिवकन्या शर्विका म्हात्रे हिच्या साहसी कामगिरीची प्रेरणा मिळाली. तिचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत उत्कर्षानेही सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आपली पहिली मोठी झेप घेतली.
ट्रेकदरम्यान अनेक ठिकाणी निसरडा रस्ता, खडतर चढाई आणि उभे उतार अशी आव्हाने होती. मात्र, उत्कर्षाने न डगमगता प्रत्येक टप्पा उत्साहाने पार केला. कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळे तिचा आत्मविश्वास अधिक वाढला आणि अखेर चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तिने माहुली गडाचा माथा गाठला.
उत्कर्षाच्या या धाडसी कामगिरीची माहिती मिळताच परिसरातील नागरिक, दुर्गप्रेमी आणि निसर्गप्रेमींकडून तिचे कौतुक होत आहे. आई-वडिलांनी पुढील दोन वर्षांत महाराष्ट्रातील १०० गडकिल्ले सर करण्याचा दृढनिश्चय केला आहे.