उमनपात ११ सप्टेंबरला सात सदस्यांवर शिक्कामोर्तब
उल्हासनगर: मागील सात महिने रखडलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीसाठी उल्हासनगर महापालिकेला मुहूर्त मिळाला असून शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी सात नगरसेवकांच्या नियुक्तीवर विशेष महासभेत शिक्कामोर्तब होणार आहे. येथे शिवसेनेचा महापौर असला तरी संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला सर्वाधिक चार स्वीकृत नगरसेवक येणार आहेत. तर शिवसेनेच्या उल्हासनगर शहर आघाडीला तीन जागा मिळणार आहेत.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एकूण ७८ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामध्ये भाजपचे ३७, शिवसेनेचे ३४, वंचित बहुजन आघाडीचे २ आणि साई पक्षाचा एक नगरसेवक आहे. या पक्षीय संख्याबळाच्या आधारे सात स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात येणार आहे. दरम्यान, उल्हासनगर महापालिकेत शिवसेना, वंचित बहुजन आघाडी आणि साई पक्षाची ‘उल्हासनगर शहर आघाडी’ म्हणून कोकण भवन येथे नोंदणी झाल्याने शिवसेनेचे संख्याबळ ३७ एवढी आहे. मात्र जातपडताळणीत शिवसेनेच्या पूजा भोईर आणि विकीसिंह लबाना अपात्र ठरल्याने शिवसेनेचे संख्याबळ दोनने कमी होऊन ३५वर आले आहे. त्यामुळे पक्षीय बलाबलानुसार भाजपच्या वाट्याला चार, तर शिवसेनेच्या वाट्याला तीन स्वीकृत नगरसेवक पदे जाणार आहेत.
आघाडीच्या एकत्रित संख्याबळाचा विचार करता वंचित बहुजन आघाडी आणि साई पक्षालाही प्रत्येकी एक स्वीकृत नगरसेवक मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपच्या चार जागांसह आघाडीतील पक्षांना मिळणाऱ्या जागांनंतर शिवसेनेच्या वाट्याला एक स्वीकृत नगरसेवक पद येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ११ सप्टेंबरच्या निवडणुकीकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ठामपाच्या मुहूर्ताकडे इच्छुकांचे डोळे
एकीकडे उल्हासनगर महापालिकेत स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असला तरी ठाणे महापालिकेत मात्र स्थायी समितीसह स्वीकृत नगरसेवकांचे घोंगडे अद्याप भिजत आहे. पक्षीय संख्याबळानुसार शिवसेनेच्या वाट्याला सहा, भाजपला दोन, शरद पवार आणि अजित पवार गटाला प्रत्येकी एक नगरसेवक मिळणार आहे. त्यामुळे सर्व पक्षांतील इच्छुक या नियुक्तीच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत.