कल्याण : कल्याण पश्चिमेतील डी.बी.चौक या वर्दळीच्या रहदारीच्या रस्त्यावर एका भरघाव स्विफ्ट कारने दिलेल्या धडकेत हातगाड्या, दुचाकी, नुकसानासह तीन पादचारी जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार कल्याण पश्चिमेतील डी.बी. चौक रस्त्यावर एका भरघाव स्विफ्ट कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने दिलेल्या धडकेत एका महिलेसह दोन जण जखमी झाल्याची घटना सोमवारी घडली. जखमीला रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तर या भीषण अपघातात हातगाड्यांसह, दोन दुचाकी वाहनांचे नुकसान झाले आहे. तर रस्त्याच्या कडेला वडे विक्री करणाऱ्या महिलेवर वडे तळण्याचे गरम तेल उडाल्याने ती जखमी झाली.
या अपघातामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. कारचालक मद्य पिऊन गाडी चालवत असल्याचा संशय असून ब्रेकऐवजी चुकून ॲक्सिलरेटर दाबल्याचा दावा पोलिसांनी केल्याची चर्चा देखील होती. घटनास्थळी पोहचत खडकपाडा पोलिसांनी ५५ वर्षीय कार चालकास ताब्यात घेत घटनेची सखोल चौकशी सुरू केली आहे. मात्र कारमध्ये दारूच्या बाटल्या आणि ग्लास आढळल्याने चालक धावत्या गाडीत मद्यसेवन करत होता का, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. खडकपाडा पोलिसांनी कार आणि चालकाला ताब्यात घेतले असून जखमींचे जबाब नोंदविले आहेत.