ठाणे : नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीनयुक्त औषधांच्या ३२९ बाटल्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंब्र्यातून जप्त केल्या. या कारवाईत पोलिसांनी मोहम्मद हामीद बाजा मोइनुद्दीन शेख (२०) याला अटक केली असून, त्याच्याकडून औषधांच्या साठ्यासह मोबाइल असा एकूण चार लाख ४८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई ५ सप्टेंबर रोजी रात्री रेतीबंदर परिसरात करण्यात आली.
मुंब्रा पोलिस ठाण्याच्या अंमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस शिपाई रोशन कदम यांना कोडीनयुक्त प्रतिबंधित औषधांच्या मोठ्या साठ्याची विक्री करण्यासाठी दोन जण येणार असल्याची माहिती मिळाली होती. वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांनी रेतीबंदर येथील रेल्वे पुलाजवळील सर्व्हिस रोडवर सापळा रचला. रात्री साडेआठच्या सुमारास एका छोट्या चारचाकी वाहनातून एक तरुण उतरून तीन बॉक्स खाली उतरवताना पोलिसांना दिसला. संशयास्पद हालचाली करत तो कोणाची तरी वाट पाहत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी त्याला घेरून ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॉक्स उघडून तपासणी केली असता त्यात ‘ओनेरेक्स’ आणि ‘फेन्सिरेस्ट’ नावाच्या कोडीनयुक्त औषधी सिरपच्या बाटल्या आढळल्या. त्यामध्ये कोडीन फॉस्फेट आणि ट्रायप्रोलिडीन हायड्रोक्लोराइड तसेच क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि कोडीन फॉस्फेट हे घटक असल्याचे नमूद होते. पहिल्या बॉक्समध्ये ११५, दुसऱ्या बॉक्समध्ये १२० आणि तिसऱ्या बॉक्समध्ये ९४ अशा एकूण ३२९ बाटल्या आढळल्या. त्या बाटल्यांची किंमत ३ लाख ९४ हजार ८०० रुपये, तर मोबाइलची किंमत १० हजार रुपये असा एकूण चार लाख ४८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीत आरोपीने हा औषधसाठा उत्तर प्रदेशातील सत्यम कुमार याच्याकडून विक्रीसाठी मागविल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.