भाईंदर : सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांना सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त फुटपाथ उपलब्ध करून देण्याबाबत कठोर भूमिका घेतल्यानंतरही भाईंदर पूर्वेतील बी.पी. रोड परिसरात फुटपाथवर अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले. मात्र, एका जागरूक नागरिकाने याविरोधात आवाज उठवित संबंधितांना जाब विचारल्यानंतर अवघ्या २४ तासांत संबंधित स्टॉल व शेड हटविण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, बी.पी. रोडवर पदपथावर गेल्या काही आठवड्यांपासून स्टॉल व शेड उभारण्यात आली होती. त्यामुळे पादचाऱ्यांसाठी असलेला पदपथ पूर्णपणे बंद झाला होता आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून मुख्य रस्त्यावरून चालावे लागत होते. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर मीरा-भाईंदरमधील जागरूक नागरिक करण पवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. करण पवार यांनी सोशल मीडियावर या पाहणीचा व्हिडीओ प्रसारित केला. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांत फुटपाथवरील स्टॉल व शेड हटविण्यात आले. पदपथ हा पादचाऱ्यांसाठी असून त्यावर अतिक्रमण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधात प्रशासनाने सातत्याने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.