जिल्हा

मतदारसंघातील झोपू योजनेला सरनाईकांनी दिली गती

मतदारसंघातील झोपू योजनेला सरनाईकांनी दिली गती
मतदारसंघातील झोपू योजनेला सरनाईकांनी दिली गती फोटो: ठाणे वैभव

१८ ते २० वर्षे रखडलेल्या प्रकल्पांचा घेतला आढावा

ठाणे: ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणांतर्गत विविध कारणांमुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिवहन मंत्री तथा ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे येथे आज  झोपडपट्टी पुनर्वसन कार्यालयात मतदार संघातील ११ प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीला संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले की, या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प मागील १८ ते २० वर्षांपासून रखडलेले असून, विकासकांकडून सातत्याने होत असलेल्या दिरंगाईमुळे झोपडपट्टीवासीयांना अद्याप त्यांच्या हक्काच्या घरांचा लाभ मिळालेला नाही. विकासकांची मनमानी आणि आडमुठी भूमिका खपवून घेतली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मंत्री सरनाईक यांनी बैठकीत मांडली.

“ज्या विकासकांना प्रकल्प पूर्ण करण्यात स्वारस्य नाही किंवा जे वर्षानुवर्षे प्रकल्प रखडवत आहेत, अशा विकासकांकडून प्रकल्प काढून घेऊन ते सक्षम आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम विकासकांकडे सोपविण्याची कार्यवाही करावी,” असे निर्देश सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा मूळ उद्देश हा झोपडपट्टीत राहणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना स्वमालकीचे, सुरक्षित आणि हक्काचे घर उपलब्ध करून देणे हा आहे. त्यामुळे कागदी घोडे नाचविण्याऐवजी प्रत्यक्ष कामाला गती देऊन पात्र लाभार्थ्यांना लवकरात लवकर त्यांच्या हक्काची घरे मिळतील, यासाठी कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

बैठकीत प्रकल्पनिहाय सद्यस्थिती, प्रलंबित परवानग्या, विकासकांची कार्यक्षमता, रहिवाशांचे प्रश्न, पुनर्वसनातील अडचणी तसेच प्रस्तावित आणि क्लस्टर योजनेशी संबंधित प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला.

“विकासकांच्या निष्क्रियतेची शिक्षा सर्वसामान्य झोपडपट्टीवासीयांना भोगावी लागता कामा नये. नागरिकांना वर्षानुवर्षे आश्वासनांच्या प्रतीक्षेत ठेवण्याऐवजी प्रकल्प पूर्ण करून त्यांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणे हीच प्राथमिकता आहे,” असे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, संबंधित प्रकल्पांबाबत आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही जलदगतीने पूर्ण करून रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475