दक्षता पथकाच्या कारवाईत निष्काळजीपणा उघड
कल्याण: प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाच्या कारवाईत समोर आला. रविवारी कल्याण रेल्वे स्थानकातील ओरिजिन एसी वेटिंग लाउंजमध्ये दक्षता पथकाने केलेल्या तपासणीत सडलेले चिकन, अंडी तसेच इतर खाद्यपदार्थ अस्वच्छ अवस्थेत आढळून आले. स्थानक परिसरात स्वयंपाक करण्यास परवानगी नसतानाही इलेक्ट्रिक उपकरणांच्या मदतीने विविध खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे आढळले.
कारवाईदरम्यान पथकाने दोन इलेक्ट्रिक तवे, सँडविच ग्रिलर, इलेक्ट्रिक इंडक्शन, ओव्हन आणि डीप फ्रायर जप्त केले. या उपकरणांच्या सहाय्याने चिकन फ्रँकी, फ्रेंच फ्राइज, पिझ्झा, चहा आणि बर्गरसह विविध खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याचे समोर आले. जप्त केलेली सर्व उपकरणे पुढील कारवाईसाठी पार्सल एलपीओकडे पाठविण्यात आली.
तपासणीदरम्यान फ्रोजन चिकन, मोमोज, नूडल्स, रेड चिकन आणि अंडी अस्वच्छ व आरोग्यास घातक परिस्थितीत आढळून आली. खाद्यपदार्थांची साठवणूक आणि स्वच्छतेची स्थिती पाहता प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
तपासणीदरम्यान एक अनधिकृत विक्रेताही आढळून आला. त्याच्याकडे वैध ओळखपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते. दक्षता पथकाने संबंधित विक्रेत्याला पुढील कारवाईसाठी आरपीएफच्या ताब्यात दिले. मिळालेल्या माहितीनुसार, विभा गुप्ता या एसी वेटिंग लाउंजच्या अधिकृत कंत्राटदार आहेत. मात्र, दक्षता पथकाच्या तपासणीत समोर आलेल्या अनियमिततांबाबतची जबाबदारी आणि पुढील कारवाई रेल्वेच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे.