संपादकीय

राज ठाकरे, कार्यक्रम द्या!

राज ठाकरे, कार्यक्रम द्या!
राज ठाकरे, कार्यक्रम द्या! फोटो: ठाणे वैभव

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी ठाण्यात राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसमोर केलेले भाषण आणि दोन दिवस आधी 'ठाणेवैभव'च्या अग्रलेखात नेमकी हीच भूमिका मांडली होती. राजकीय नेत्यांनी जाहीर व्यासपीठावरून भूमिका मांडणे आणि संपादकाने मतप्रदर्शन करणे यात मूलतः एक फरक असतो आणि तो म्हणजे समाजाला वास्तवाचे भान दिल्यावर नेतेमंडळी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत त्यांच्या विचाराला कृतीचे रूप देऊ शकतात. संपादकाचा विचार हा कृतीपर्यंत पोहोचण्यासाठी समाजाच्या भावना अत्यंत तीव्र स्वरूपाच्या असाव्या लागतात आणि त्याविरुद्ध वा त्याबाजूने उभे राहण्यासाठी उत्स्फूर्तता असावी लागते. अलीकडे ही उत्स्फूर्तता आणि तत्परता अभावानेच दिसते, इतकी उदासीनता अथवा हतबलता समाजात रुजली आहे. असो. मुद्दा राज ठाकरे यांच्या भाषणाचा आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार कसा होईल हे पाहण्याचा. 

सणावाराबद्दल आमचे दुमत नाही. ते दणक्यात साजरे व्हायलाच हवेत. अर्थात हा दणका कृत्रिमपणातून येता कामा नये. त्यादृष्टीने डॉ. महेश बेडेकर यांचे मत आम्हाला मान्य आहे आणि त्याचा आम्ही पुरस्कारही केला आहे. धार्मिक भावना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि जरासा धक्का लागला तर काचेच्या भांड्याप्रमाणे त्याची गत होऊ शकते. काचेचे हे गुणवैशिष्ट्य सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे आणि भांडे फुटणार नाही याची काळजीही घ्यायला हवी. धर्माचे हिडीस प्रदर्शन होणार नाही याची काळजी घेऊन त्याचे मांगल्य आणि पावित्र्य वाढवणे हे खरे तर सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे. त्याबद्दल दुमत असायचे कारण नाही. पर्यावरणाचा आग्रह धरताना धार्मिक भावनांना ठेच लागणार नाही याची काळजी घेतली जाणे आवश्यक आहे. सर्वधर्म समभाव हा विचार पर्यावरणाला वगळून होऊ शकत नाही.

आता 'ठाणेवैभव'च्या २ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाबद्दल. शीर्षक होते...तरच साखर गोड लागेल. साखरेचे भडकलेले भाव आणि सणासुदीचे दिवस या विषयावर लिहिताना आपल्या राजकारण्यांना महागाईपासून, विकास प्रकल्पातील दिरंगाई, सरकारी कर्मचाऱ्यांतील अकार्यक्षमता, फोडाफोडीचे राजकारण आणि धार्मिक आणि जातीय भिंती उभ्या करून समाजात विद्वेष पसरविण्याचा धंदा यांची कोणाला फिकीरच राहिलेली नाही. हे सर्व हेतुपुरस्सर होत आहे का? महाराष्ट्र कायम अशांत राहावा आणि त्याचे स्थान अलगद अन्य राज्यांना मिळावे अशी कुटील नीती आखली जात आहे काय, अशी शंका तर 'ठाणेवैभव'ने अनेकदा व्यक्त केली आहे. राज ठाकरे यांनी हा नेमका धागा पकडला याचे आम्हाला समाधान आहे. परंतु संपादक म्हणून आमच्या मर्यादांवर राज ठाकरे यांनी 'मनसे'ची ताकद त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांना कृतीत रूपांतरित करून दाखवले तर आमच्या लेखणीला झिजल्याचे समाधान लाभेल. बोला, राज ठाकरे, तुमच्या मनसैनिकांना कोणता ठोस कार्यक्रम देताय? राज्यातील जनता त्याची वाट पाहत आहे! राजकारणाला सवंगपणातून बाहेर काढण्यासाठी एक ठिणगी लागते, त्यातून आग भडकू शकते किंवा हरवलेली वाट दाखवणारी एक ज्योत!

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475