* आश्वासित प्रगती योजना आणि लिपिकांच्या पदोन्नतीची कार्यवाही सुरू
* आमदार संजय केळकर आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय
ठाणे: ठाणे महानगरपालिका कर्मचारी व कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यालयात आयोजित संयुक्त बैठकीत आमदार संजय केळकर यांनी केलेल्या मागण्यांपैकी तीन मागण्यांवर प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू केली आहे. त्यानुसार सफाई कर्मचाऱ्यांना गृहसंकुल, आश्वासित प्रगती योजना आणि लिपिकांच्या पदोन्नतीबाबत निर्णय घेण्यात आले. त्याबाबतची परिपत्रके देखील निर्गमित करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
ठाणे महानगरपालिकेतील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आमदार संजय केळकर यांनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची १० ऑगस्ट रोजी बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली. बैठकीत एकूण दहा विषयांपैकी तीन महत्त्वाचे विषय प्रशासनाने तत्काळ मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू केली असून, त्यासंदर्भात परिपत्रके निर्गमित करण्यात आली आहेत.
या बैठकीतील निर्णयानुसार महानगरपालिका कर्मचारी व संबंधित पात्र कर्मचाऱ्यांना १०-२०-३० आश्वासित प्रगती योजना लागू करून त्याचा आर्थिक लाभ तत्काळ देण्याबाबत कार्यवाही करण्यात आली आहे. महानगरपालिकेतील पात्र लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती देऊन तत्काळ नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य योजनेअंतर्गत पात्र सफाई कर्मचाऱ्यांना गृहसंकुल उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. उर्वरित प्रलंबित विषयांच्या निराकरणासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.
महत्वाचे विषय मार्गी लागल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून आमदार केळकर आणि प्रशासनाचे कामगारांच्या वतीने आभार मानण्यात आले.
बैठकीस नगरसेवक विकास पाटील, उषा वाघ, सुरेश कांबळे यांच्यासह विशाल वाघ, रविंद्र रेड्डी, राजाभाऊ सोनगडा, दयाशंकर यादव, दत्ता घुगे, अजित मोरे आदी पदाधिकारी आणि कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.