कल्याण: तब्बल दहा वर्षांनंतर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत सुरू करण्यात आलेली भरती प्रक्रिया आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. टीसीएस कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेवर मनसे, भाजप आणि काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी आक्षेप घेतला असून ही प्रक्रिया तत्काळ स्थगित करून रद्द करण्याची मागणी केली आहे.
मनसेचे नगरसेवक गणेश लांडगे यांनी भरती प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप केला. भरती प्रक्रियेसाठी टीसीएस कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून, या कंत्राटामध्ये गैरप्रकार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. प्रशासनाकडे मागवलेली माहिती जवळपास चार महिन्यांपर्यंत देण्यात आली नाही, तर गेल्या आठ दिवसांत देण्यात आलेली माहितीही अपुरी असल्याचा दावा लांडगे यांनी केला. तसेच, केडीएमसीच्या भरती प्रक्रियेत स्थानिकांना कोणतीही सुविधा किंवा सवलत देण्यात आलेली नसल्याने मनसेने या प्रक्रियेला विरोध दर्शविला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत गणेश लांडगे यांनी यावरून आक्षेप घेतला. आगामी महासभेतही हा मुद्दा उपस्थित करून भरती प्रक्रियेला विरोध करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनीही टीसीएसच्या माध्यमातून करण्यात येणारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती तत्काळ स्थगित करण्याची मागणी स्थायी समितीच्या सभेत केली. टीसीएसच्या माध्यमातून ज्या-ज्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे, त्या ठिकाणी गैरप्रकार आणि घोटाळ्यांच्या तक्रारी समोर आल्याचा दावा म्हात्रे यांनी केला. महापालिकेची प्रशासकीय राजवट असताना भरतीसंदर्भातील ठराव करण्यात आला; मात्र या प्रक्रियेबाबत लोकप्रतिनिधींना पुरेशी माहिती देण्यात आली नाही, असा आरोपही त्यांनी केला.
भरती प्रक्रियेबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याने पारदर्शकता आणि निष्पक्षतेसाठी भरतीला तत्काळ स्थगिती देऊन संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करावी, अशी मागणी दीपेश म्हात्रे यांनी केली. तसेच भरतीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची मागणीही त्यांनी केली.
काँग्रेसच्या गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनीही केडीएमसीच्या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. इतर काही महानगरपालिकांमध्ये टीसीएसच्या माध्यमातून झालेल्या भरती प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी समोर आल्यानंतर त्या भरती प्रक्रिया रद्द करण्यात आल्याचा दावा कुलकर्णी यांनी केला. त्यामुळे भरती प्रक्रियेतही आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे सांगत कांचन कुलकर्णी यांनी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली आहे.