उल्हासनगर: उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर शहरांतील डंपिंग ग्राऊंडची गंभीर समस्या लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. तिन्ही शहरांसाठी प्रस्तावित जॉईंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पाचे काम नोव्हेंबरमध्ये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाला गती देण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए कार्यालयात बैठक झाली. बैठकीत प्रकल्पासाठी आवश्यक मशिनरी, शेड व इतर साहित्य उपलब्ध करून देण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच संबंधित कंत्राटदार कंपनीला कोणताही विलंब न करता काम सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठकीला एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासु, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळे, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, सभागृहनेते अरुण आशान यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
तिन्ही शहरांची वाढती लोकसंख्या आणि कचऱ्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता हा प्रकल्प तातडीने सुरू करण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. दरम्यान, उल्हासनगरमधील सॅटिस प्रकल्पासह इतर विकासकामांबाबतही बैठकीत चर्चा झाली असून त्याबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.