जिल्हा

मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांना ‘नवी’ एक्सपायरी

मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांना ‘नवी’ एक्सपायरी
मुदत संपलेल्या खाद्यपदार्थांना ‘नवी’ एक्सपायरी फोटो: ठाणे वैभव

तुर्भेत गुन्हे शाखेचा छापा; १८ निर्यातदारांचा तब्बल २.४६ कोटींचा माल ताब्यात

नवी मुंबई: विविध नामांकित कंपन्यांच्या खाद्यपदार्थांच्या पॅकेटवरील मूळ उत्पादन तारीख, ‘बेस्ट बिफोर’ आणि ‘एक्सपायरी डेट’मध्ये फेरफार करून वाढीव मुदत टाकून माल विक्री व निर्यातीचा धक्कादायक प्रकार नवी मुंबई गुन्हे शाखेने उघडकीस आणला आहे.

तुर्भे येथील टीटीसी औद्योगिक वसाहतीमधील मे. साधना एंटरप्रायजेसच्या वेअरहाउसमध्ये छापा टाकून मोठ्या प्रमाणात संशयित खाद्यपदार्थांचा साठा सील करण्यात आला.

गुन्हे शाखेला 24 ऑगस्ट रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी वेअरहाउसमध्ये तपासणी केली असता, खाद्यपदार्थांच्या पॅकेजवरील मूळ उत्पादन तारीख व मुदत समाप्तीची माहिती थिनरच्या सहाय्याने पुसून त्यावर इंकजेट मशीनद्वारे नवीन व वाढीव तारीख छापली जात असल्याचे आढळून आले. यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. गुन्हे शाखा आणि एफडीए यांच्या संयुक्त तपासणीत 24 ते 30 ऑगस्टदरम्यान वेअरहाउसमधील मालाची तपासणी करण्यात आली. या कारवाईत 18 निर्यातदार कंपन्यांचा सुमारे दोन कोटी 46 लाख 53,354 रुपयांचा माल आढळून आला. यापैकी 11 निर्यातदारांचा सुमारे 75 लाख 21,269 रुपयांचा माल तपासणीदरम्यान संशयास्पद आढळला. कुरकुरे, लेज, मॅगी, विविध मसाले, सूप, स्नॅक्स तसेच थम्स अप, लिमका यांसारख्या शीतपेयांसह विविध खाद्यपदार्थांच्या पॅकेजवरील उत्पादन तारीख, एक्सपायरी/बेस्ट बिफोर तारीख आणि बॅच नंबरमध्ये फेरफार केल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले.

ही कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोदकुमार शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. मुदत संपलेल्या किंवा मुदत वाढवून विक्रीसाठी पाठविण्यात येणाऱ्या खाद्यपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475