उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात डॉ. रेवती श्रीनिवासन यांचे कार्य ठाण्यासाठी अभिमानास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित 'क्रिएटिंग क्लासरूम्स व्हेअर एवरी चाईल्ड बिलॉंग्ज' या पुस्तकाचा सोहळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथील 'सत्कार रेसिडेन्सी' येथे पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार आनंद परांजपे, उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील तसेच शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येकाला समान संधी मिळण्यासाठी वर्गातील वातावरण सर्वसमावेशक असणे गरजेचे आहे. हे पुस्तक शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल," असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
गेल्या तीन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात अविरत योगदान देणाऱ्या डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी सर्वसामान्य मुलांसोबतच विशेष गरजा असणाऱ्या ग्रामीण व वंचित घटकांतील मुलांसाठी थेरपी सेंटर्स आणि विशेष उपक्रम राबवून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. लंडनच्या 'हाऊस ऑफ लॉर्ड्स'मध्ये झालेला त्यांचा सन्मान आणि त्यांनी निर्माण केलेला शैक्षणिक वारसा संपूर्ण ठाणेकरांसाठी अभिमानास्पद आहे.
यावेळी डॉ. रेवती श्रीनिवासन यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या की, शिक्षणाचा खरा उद्देश केवळ साक्षरता नसून, प्रत्येक बालकाच्या क्षमतेचा शोध घेऊन त्याला समाजात आत्मसन्मानाने जगण्याचे बळ देणे हा आहे. सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच विशेष गरजा असणारी मुले ग्रामीण आणि सामाजिक, आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुले यांच्यासाठी परिश्रम घेणे आवश्यक आहे. विशेष थेरपी सेंटर्स आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून या मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली पाहिजे.