जेष्ठ नागरिकांचे हाल
भिवंडी: भिवंडी महापालिकेच्या जुन्या प्रशासकिय इमारतीच्या दुरुस्तीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरु असताना या कामांमधील त्रुटींबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून पालिकेच्या विद्युत विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे या इमारतीमध्ये असलेली लिफ्ट बंद आहे. त्यामुळे पालिकेतील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांना तीन मजल्यांपर्यंत जीना चढून जावे लागत आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या काप आळी भागात जुनी आणि नवीन अशा दोन प्रशासकीय इमारती असून त्यापैकी जुन्या प्रशासकीय इमारतीस सुमारे ४० वर्षे झाली आहेत. त्यामुळे ही इमारत धोकादायक घोषित केली होती. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारामार्फत दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. दुरुस्तीचे काम सुरु असताना पालिकेचे काही विभाग मात्र याच इमारतीमध्ये प्रशासनाने सुरु ठेवले. सध्या प्रभाग समिती एक व प्रभाग समिती दोन अशा दोन कार्यालयांसह त्यांची दोन स्वतंत्रपणे मालमत्ता कर विभागाची कार्यालये आणि परवाना विभागाचे कार्यालय सुरु आहे. या इमारतीला एक लिफ्ट असून ती गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने नागरिकांना आणि पालिका कर्मचाऱ्यांना तीन मजल्यांपर्यंत जिने चढून जावे लागत आहे. या ठिकाणी दोन प्रभाग समित्यांची कार्यालये असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक मालमत्ता कर भरायला येत असतात. परंतु इमारतीमधील लिफ्ट बंद असल्याने बहुतांश नागरिक तीन मजले चढण्यासाठी टाळाटाळ करतात. त्याचा परिणाम मालमत्ता कर वसुलीवर होत असल्याचे पालिका सूत्राने सांगितले.
इमारतीमधील प्रभाग समितीच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी लिफ्ट बंद असल्याबाबतचा अहवाल मनपाच्या विद्युत विभाग व पालिका प्रशासनाला पाठवलेला आहे. मात्र त्याकडे संबधितांनी दुर्लक्ष केले आहे. इमारतीमध्ये विद्युत पुरवठा करणारे पॅनल केबल वायर बॉक्स उघडा असल्यामुळे शॉर्ट सर्किट होण्याची भीती आहे. तसेच इमारतीमधील लिफ्ट बंद असल्यामुळे अनेक ज्येष्ठ व इतर नागरिक मालमत्ता कर भरण्यासाठी जात नाहीत त्यामुळे महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत आयुक्त अनमोल सागर यांनी तातडीने चौकशी करून बंद असलेली लिफ्ट चालू करावी, अशी मागणी भीमशक्ती या सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.
भिवंडी महानगरपालिकेच्या जुन्या इमारतीमध्ये दुरुस्तीच्या कामासंदर्भात लवकरच पाहणी केली जाईल आणि लिफ्ट सुरू करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील, असे मुख्यालय उपायुक्त विक्रम दराडे यांनी सांगितले.