जिल्हा

बीएलओंना १७ लाख मतदार सापडलेच नाहीत

बीएलओंना १७ लाख मतदार सापडलेच नाहीत
बीएलओंना १७ लाख मतदार सापडलेच नाहीत फोटो: ठाणे वैभव

ठाणे: निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेत तब्बल १७ लाख मतदारांचा पत्ताच लागला नसल्याची बाब समोर आली आहे.

मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (बीएलओ) जेव्हा प्रत्यक्ष घरभेटी देऊन सर्वेक्षण केले, तेव्हा हे मतदार दिलेल्या पत्त्यावर सापडलेच नाहीत. त्यामुळे मतदार यादीतून १७ लाख ८ हजार ठाणेकर गेले कुठे? असा सवाल उपस्थित झाला असून एसआयआर मोहिमेवर शंका व्यक्त केली जात आहे.

ठाणे जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष सखोल फेरबदल (एसआयआर) प्रक्रिया पूर्ण झाली असून, या मोहिमेत जिल्ह्यातील तब्बल ७४ लाख ५०,५१५ मतदारांच्या नोंदींची छाननी करण्यात आली. जिल्ह्यातील ६,८९४ मतदार यादी भागांमध्ये ६,८९४ मतदान बीएलओ प्रत्यक्ष क्षेत्रात उतरून घरभेटी घेत मतदारांच्या नोंदींची पडताळणी केली असल्याचा दावा प्रशासनाने केला. या संपूर्ण प्रक्रियेनंतर समोर आलेली आकडेवारी धक्कादायक असून, तब्बल २८ लाख ६०,३०३ नोंदी मयत, गैरहजर, स्थलांतरित, दुबार आणि इतर अशा वर्गवारीत आल्या आहेत. त्यामुळे आता अंतिम मतदार यादीत ठाणे जिल्ह्यातील किती नावे कायम राहणार, याकडे सर्वच राजकीय पक्षांसह मतदारांचे लक्ष लागले आहे.

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ७४ लाख ५०,५१५ मतदारांपैकी ४५ लाख ९०,२४९ म्हणजेच ६१.६१ टक्के मतदारांचे सर्वेक्षण फॉर्म्स डिजिटाईज करण्यात आले आहेत. उर्वरित २८ लाख ६०,२६६ नोंदींमध्ये स्थलांतरित ७ लाख ३५ हजार तर मृत्यू दोन लाख २२ हजार मतदारांचा मृत्यू झाले असून शोध न लागलेले तब्बल १७ लाख आठ हजार मतदारांचा समावेश आहे.

भिवंडी ग्रामीणमध्ये ६८,०२२, शहापूरमध्ये ४७,३९५, भिवंडी पश्चिममध्ये १,५५,१२९, भिवंडी पूर्वमध्ये १,८४,७१६, कल्याण पश्चिममध्ये १,९७,६६१, मुरबाडमध्ये १,३४,४५३, अंबरनाथमध्ये १,६९,७७३, उल्हासनगरमध्ये ७०,८७२, कल्याण पूर्वमध्ये १,४३,५११, डोंबिवलीमध्ये १,३२,६५३, कल्याण ग्रामीणमध्ये २,५२,३८७, मीरा भाईंदरमध्ये २,१३,२३५, ओवळा माजिवडामध्ये २,५१,४३८, कोपरी पाचपाखाडीमध्ये १,११,०८३, ठाण्यामध्ये १,३१,२५०, मुंब्रा कळवामध्ये २,१३,६२६, ऐरोलीमध्ये २,१९,१४२ आणि बेलापूरमध्ये १,६५,३३१ मतदारांच्या नोंदींचे डिजिटायझेशन अद्याप पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यात सर्वाधिक उर्वरित नोंदी कल्याण ग्रामीणमध्ये २,५२,३८७ असून त्यानंतर ओवळा माजिवडा येथे २,५१,४३८ नोंदी आहेत.

राजकीय पक्ष आणि विरोधकांनी या मोहिमेच्या पारदर्शकतेवर अनेकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बीएलओ कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष घरोघरी न जाता घरबसल्या चुकीचे सर्वेक्षण केले, ज्यामुळे अनेक खऱ्या आणि जुन्या मतदारांची नावेही या यादीतून गायब झाल्याचा आरोप अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.

३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी आहे. त्यावर सुनावणी २९ ऑक्टोबरपर्यंत करण्यात येणार आहे. दरम्यान, अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्धी करण्यात येणार आहे. सर्व मतदारांना मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करून घ्यावी आणि आवश्यक असल्यास वेळेत संबंधित कागदपत्रांसह सुनावणी प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475