जिल्हा
४८ हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार मोफत साड्या
४८ हजार शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळणार मोफत साड्या
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: राज्यातील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारकांसाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा निर्णय घेतला असून, या योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यातील पात्र कुटुंबांना आता दरवर्षी एका साडीचे मोफत वाटप करण्यात येणार आहे.
सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या 'कॅप्टीव्ह मार्केट' योजनेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव मस्के पाटील यांनी दिले आहेत. या विशेष मोहिमेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांमधील एकूण 48,704 अंत्योदय कुटुंबांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे.
शासनाने या योजनेच्या वितरणासाठी श्रीराम नवमीचा मुहूर्त निश्चित केला असून, कापडी पिशवीसह या साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाची 'नोडल एजन्सी' म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, महामंडळाकडून तालुक्यातील गोदामांपर्यंत साड्यांचा पुरवठा केला जात आहे. प्राप्त सांख्यिकीनुसार, शहापूर तालुक्यात सर्वाधिक 18,268 साड्यांचे वाटप होणार असून, त्यापाठोपाठ मुरबाडमध्ये 11,221, भिवंडीत 11,474, अंबरनाथमध्ये 4084 आणि कल्याण तालुक्यात 2881 साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त 'एफसीआय भिवंडी'साठी 776 साड्यांची तरतूद करण्यात आली आहे.
साड्यांच्या वितरणात पारदर्शकता राखण्यासाठी 'ई-पॉस' मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला असून, प्रत्येक वितरणाची नोंद 'ऑनलाइन' पद्धतीने एई-पीडीएस (AePDS) पोर्टलवर घेतली जाणार आहे. गोदामांमध्ये प्राप्त होणाऱ्या साड्यांच्या गड्यांचे वजन साधारणपणे 41 ते 46 किलो (100 साड्या) निश्चित करण्यात आले असून, साठवणूक आणि हाताळणी दरम्यान साड्या खराब होणार नाहीत याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश तहसीलदारांना देण्यात आले आहेत. 'रूट ऑप्टिमायझेशन' प्रणालीनुसार साड्यांचे वाहतूक नियोजन करण्यात आले असून, तालुक्यातील रास्त भाव दुकानांपर्यंत या साड्या विनाविलंब पोहोचवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कोणताही पात्र लाभार्थी या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी पुरवठा विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475