जिल्हा

झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचे काम ४५ टक्के पूर्ण

झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचे काम ४५ टक्के पूर्ण
झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचे काम ४५ टक्के पूर्ण फोटो: ठाणे वैभव
ठाणे: दरवर्षी ठाणे महापालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांंद्यांची छाटणी केली जाते. यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहीमेची सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत ६३६७ झाडांपैकी २७५३ झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात आल्या आहेत. हे प्रमाण सरासरी ४५ टक्के एवढे आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार, महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते, पदपथ, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, रुग्णालये, उद्याने, चौक, बस स्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे. पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जात आहे. त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे ६३६७ झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येणार असल्याची माहिती वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे यांनी दिली. नौपाडा-कोपरी (३५ टक्के), उथळसर (४० टक्के), लोकमान्य नगर-सावरकर नगर (४२ टक्के), वागळे (३५ टक्के), माजिवडा-मानपाडा (६० टक्के), वर्तकनगर (४८टक्के), कळवा (४६ टक्के), मुंब्रा (६३ टक्के) आणि दिवा (२४ टक्के) या प्रभाग समिती क्षेत्रात ही मोहिम सुरू आहे. झाडांच्या धोकादायक फांद्या काढणे व अतिरिक्त पर्णभार कमी करण्याचे एकूण सरासरी प्रमाण ४५ टक्के एवढे आहे. उर्वरित काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही वृक्ष अधिकारी सोनावणे यांनी सांगितले. उन्हाळ्यात झाडांच्या सावलीचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळावा व झाडांची नैसर्गिक वाढ अबाधित रहावी, यासाठी अत्यावश्यक असेल तेथेच धोकादायक फांद्यांची छाटणी केली जात आहे. तसेच, वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभागातील माजी नगरसेवक, लोकप्रतिनिधी यांच्याशीही या मोहिमेबाबत संपर्क साधण्यात येत आहे. त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर, या फांद्या काढल्यामुळे निर्माण होणारा हरित कचरा संकलित करुन शास्त्रशुध्द पध्दतीने सेंद्रिय खत निर्मितीकरिता ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी येथील हरित कचरा व्यवस्थापन केंद्राकडे पाठविण्यात येत आहे. धोकादायक झाडांबाबत नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी १८००-२२२-१०८ आणि ८६५७८८७१०१ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475