३० सप्टेंबरपर्यंत हरकती दावे दाखल करण्याची संधी
ठाणे : निवडणूक आयोगाने राबवलेल्या एसआयआर मोहिमेत जवळपास ४६ लाख मतदारांची नोंदणी करण्यात आली असून ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत हरकती-दावे दाखल करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
या प्रारूप यादीनुसार १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण ४५ लाख ९१,१३८ मतदार नोंदवले गेले असून यात २३ लाख ५०,७९५ पुरुष, २२ लाख ३९,६४९ महिला आणि ६९४ इतर मतदारांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात २८ लाख ५९,३७७ मतदारांचे अर्ज प्राप्त न झाल्याने ही नावे रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी एकूण ६८३१ मतदान केंद्रांवर ही प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली असून मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच पदनिर्देशित ठिकाणी ती नागरिकांना पाहण्यासाठी खुली आहे तसेच जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना ही प्रारूप मतदारयादी देण्यात येत आहे.
या मोहिमेअंतर्गत ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नागरिकांना मतदारयादीबाबतचे आपले दावे व हरकती नोंदवता येणार आहेत. ज्या नागरिकांना मतदारयादीत नवीन नाव समाविष्ट करायचे आहे त्यांनी नमुना क्र. ६, नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७, तर नावातील अथवा पत्त्यातील दुरुस्तीसाठी नमुना क्र. ८ योग्य त्या कागदपत्रांसह व घोषणापत्रासह दाखल करावयाचा आहे.
नागरिकांकडून प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत सुनावणी घेऊन ते निकालात काढले जातील आणि त्यानंतर ४ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येईल.