| पदनाम | मंजूर | भरलेली | रिक्त |
| मुख्य अधिकारी | ०१ | ०० | ०१ |
| उपमुख्य अधिकारी | ०१ | ०१ | ०० |
| विभागीय अधिकारी | १२ | ०१ | ११ |
| केंद्र अधिकारी | २१ | १४ | ०७ |
| सह केंद्र अधिकारी | ५६ | ०६ | ५० |
| लीडींग फायरमन | ७० | ६७ | ०३ |
| चालक, यंत्रचालक | २२४ | ३० | १९४ |
| फायरमन | ४५० | ९० | ३६० |
| एकूण | ८३५ | २०९ | ६२६ |
जिल्हा
२६ लाख ठाणेकर; अग्निवीर फक्त २०९!
२६ लाख ठाणेकर; अग्निवीर फक्त २०९!
फोटो: ठाणे वैभव
ठाणे: रोज सरासरी तीन किंवा चार आगीच्या घटनांना सामोरे जाणार्या ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलात ७५ टक्के पदे रिक्त असून २६ लाख ठाणेकरांच्या अग्निसुरक्षेची जबाबदारी अवघ्या २०९ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे दलाचा कारभार तूर्त राम भरोसे सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शहराच्या लोकसंख्येनुसार अग्निशमन दलामध्ये ८३५ अधिकारी, कर्मचार्यांची आवश्यकता आहे, मात्र गेली अनेक वर्षे मंजूर पदांपैकी ६२६ पदे रिक्त असून केवळ २०९ ‘अग्नीविरांनाच शहरातील आगीच्या घटनांसह आपत्तीवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे.
मुख्यमंत्र्यांच्या बदलत्या ठाण्यात नवनवीन बहुमजली गृहसंकूले उभी राहत आहेत. त्यांना मुलभूत सुविधा पुरवत असताना ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाकडे पुरते दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये एक याप्रमाणे नऊ अग्निशमन केंद्रे आहेत. पण या अग्निशमन केंद्रामध्ये सध्या कर्मचार्यांची वानवा आहे. विशेष म्हणजे या नऊपैकी एका केंद्रामध्ये केवळ एक क्यूआरटी वाहन ‘बेवारस’ ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे सर्वाधिक टोलेजंग इमारत असलेल्या घोडबंदर भागाची ही अवस्था आहे.
शहरात एकीकडे टोलजंग इमारती उभ्या राहत असून लोकसंख्या २६ लाखांच्या घरात गेली आहे. अशावेळी मुख्य अग्निशमन दल अधिकार्यासह ८३५ अधिकारी, कर्मचार्यांची गरज आहे. इतकी पदेही मंजूर झाली आहेत. मात्र त्यापैकी २०९ पदे भरण्यात आली आहेत. यामध्ये सर्वात पुढे असलेले फायरमनचे ४५० पैकी ३६० पदे रिक्त आहेत. म्हणजे फायरमनचे ८० टक्केहून अधिक पदे रिक्त आहेत. शहरात कचर्याला आग लागण्यापासून मोठ्या घटना घडत आहेत. २२ जानेवारीला एकाच दिवशी १० ठिकाणी आगी लागल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी आगीच्या धुरात घुसमटून एका वृद्धाला जीव गमवावा लागल्याची घटनाही घडली होती.
पद भरतीसाठी दोन वर्षांपासून शासन दरबारी प्रस्ताव पाठवत आहोत. लोकसंख्येच्या तुलनेत अग्निशमन दलाकडे असणारे बळ अपूरे पडत असून मंजूर पदे भरण्याची विनंती करण्यात आली आहे. मात्र अजून कार्यवाही झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाचे प्रमुख गिरीष झळके यांनी दिली.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475