जिल्हा
नवी मुंबईत वायू प्रदूषण करणारी १९ बांधकामे बंद
नवी मुंबईत वायू प्रदूषण करणारी १९ बांधकामे बंद
फोटो: ठाणे वैभव
४२ ठिकाणी नोटीसा
नवी मुंबई : शहरातील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने कडक पावले उचलली असून डिसेंबर महिन्यात प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या ४२ बांधकामांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यातील १९ बांधकाम साईटवरील कामे थांबविण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
हिवाळी कालावधीत वाऱ्याचा वेग कमी, वातावरणातील आर्द्रता आणि धुरकट स्थितीमुळे जमिनीलगतची प्रदूषके हवेत अडकून राहतात. त्यामुळे दरवर्षी या काळात नवी मुंबईत वायू प्रदूषणात वाढ होत असल्याचे निरीक्षण नोंदवले जाते. याच पार्श्वभूमीवर महापालिकेने सन २०२४ मध्ये २७ मुद्द्यांची वायू प्रदूषण नियंत्रण मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची अंमलबजावणी सुरू आहे.
या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ‘जीआरएपी-४’ अंतर्गत ज्या भागांत हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) २०० पेक्षा अधिक नोंदवला गेला, त्या १९ ठिकाणांवरील बांधकामे तातडीने थांबविण्यात आली. तसेच बांधकाम स्थळांवरील प्रदूषण रोखण्यासाठी मानक कार्यप्रणाली लागू करण्यात आली असून प्रत्येक बांधकामस्थळी हवा गुणवत्ता मापक उपकरणे बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. आतापर्यंत ३० बांधकाम स्थळांवर ही उपकरणे बसवण्यात आली असून उर्वरित ठिकाणी काम सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.
विभागीय पातळीवर नेमण्यात आलेल्या भरारी पथकांमार्फत तपासणी करून आतापर्यंत ३२ ठिकाणी सूचनापत्रे, १० ठिकाणी कारणे दाखवा नोटिसा आणि १९ ठिकाणी काम बंद नोटिसा देण्यात आल्या आहेत. याशिवाय १७३ विकासकांना दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्याचे महापालिकेने सांगितले आहे. तसेच, रस्त्यांच्या कडेला साचलेली माती स्वच्छ करून प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुणे तसेच एनकॅप वाहनांद्वारे पाण्याची फवारणी अशा उपाययोजना नियमितपणे केल्या जात असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, सानपाडा परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांकाबाबत प्रसिद्ध होणाऱ्या काही आकडेवारीवर महापालिकेने स्पष्टता दिली आहे. त्रयस्थ संस्थांच्या लो-कॉस्ट सेन्सर किंवा अंदाजांपेक्षा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची (CPCB) वेबसाइट आणि ‘समीर’ ॲपवरील अधिकृत नोंदीच विश्वासार्ह असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी हवा गुणवत्ता विषयक माहितीसाठी या अधिकृत स्रोतांचा आधार घ्यावा आणि प्रदूषण नियंत्रणासाठी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
300x450
300x600