जिल्हा
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढील काळात डिजिटल
दहावी-बारावीच्या परीक्षा पुढील काळात डिजिटल
फोटो: ठाणे वैभव
राज्य मंडळाचे संकेत
पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेत पुढील काळात डिजिटल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे संकेत देण्यात आले.
डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून कागदाचा वापर कमी करण्याला प्राधान्य देण्याचे सूतोवाच राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी केले, तर शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी त्याला दुजोरा दिला.
इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका छपाईसाठी १० कोटी ७२ लाख ८० हजार ३६० पृष्ठे, नमुना उत्तरपत्रिकांसाठी १९ लाख २९ हजार ३८० पृष्ठे अशी एकूण १० कोटी ९२ लाख ०९ हजार ७४० पृष्ठांवर छपाई करण्यात आली. त्यासाठी अंदाजे २२३ मेट्रिक टन कागद वापरण्यात आला. तसेच, एक कोटी सहा लाख ५६ हजार उत्तरपत्रिकांची छपाई करण्यात आली. त्यासाठी अंदाजे १७०० मेट्रिक टन कागद वापरण्यात आला.
‘परीक्षेसाठी लागणारा कागद झाडांपासून तयार होतो. त्यामुळे पर्यावरणाचा विचार करून पुढील काळात राज्य मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे आवश्यक आहे,’ असे त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी ‘सी-डॅक’ या संस्थेने तयार केलेल्या आभासी प्रयोगशाळा प्रणालीचे उदाहरण देऊन, ‘प्रात्यक्षिक परीक्षा डिजिटल पद्धतीने घेता येऊ शकतात,’ असे सांगितले.
‘यंदा बारावीच्या परीक्षेवेळी प्रश्नपत्रिकांची गोपनीयता राखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. त्यात प्रायोगिक तत्त्वावर पुणे विभागातील बारामती तालुक्यात असलेल्या दहावी-बारावी परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका सुरक्षितरीत्या पोहोचविण्यासाठी डिजिटल ट्रंकचा वापर केला गेला. या प्रयोगाच्या यशस्वितेनंतर त्याचा राज्यभरात वापर करण्याच्या दृष्टीने येत्या काळात निर्णय घेण्यात येईल,’ असेही त्यांनी नमूद केले.
राज्य मंडळाने यंदापासून गुणपत्रक आणि प्रमाणपत्र स्वतंत्र न देता एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे नाव आधार कार्डाप्रमाणे नमूद केले जाणार आहे. ही प्रमाणपत्रे १५ दिवसांत उपलब्ध होणार आहेत. या प्रमाणपत्रावर विद्यार्थ्याचे छायाचित्र, बारकोडचा वापर करण्यात आला आहे. या प्रक्रियेमुळे राज्य मंडळाला ३ कोटी रुपयांची बचत करणे शक्य झाल्याचे त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT 300x475
ADVERTISEMENT 300x475