जिल्हा

बनावट सोने देऊन औषध विक्रेत्याला १० लाखांचा गंडा

बनावट सोने देऊन औषध विक्रेत्याला १० लाखांचा गंडा
बनावट सोने देऊन औषध विक्रेत्याला १० लाखांचा गंडा फोटो: ठाणे वैभव
अंबरनाथ: खरे सोने दाखवून नंतर सोन्यासारख्या दिसणाऱ्या बनावट मण्यांची माळ देऊन १० लाखांची फसवणूक करणाऱ्याला अंबरनाथ पोलिसांनी गुजरातमधून अटक करून त्याच्याकडून चार लाख रुपयांची रक्कम जप्त केली. या प्रकरणी धर्मा मानसिंग कच्छी (५२) याला पोलिसांनी जेरबंद केले आहे. कच्छी याने फसवणुकीच्या पैशातून मुलासाठी महागडी दुचाकी खरेदी केल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. उल्हासनगरात राहणारे औषध दुकानदार सूरज शामनानी (२४) यांना उल्हासनगर कॅम्प ५ मधील नेहरु नगर येथे राहणाऱ्या कच्ची याने विश्वासात घेऊन आपल्याकडे सोने असल्याची बतावणी केली. तसेच सोन्याचे काही तुकडे शामनानी यांना खात्री करण्यासाठी दिले. शामनानी यांनी हे सोन्याचे तुकडे एका सोनाराकडे नेऊन त्याची खात्री केली. यावेळी हे सोने खरे असल्याचे निदर्शनास आले. मात्र त्यानंतर आरोपीने अंबरनाथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ सप्टेंबर रोजी फिर्यादी शामनानी यांच्याकडून १० लाख रुपये स्वीकारून त्यांना सोन्याच्या मण्यांची माळ दिली. मात्र हे सोने फिर्यादीने सोनारकडे नेले असता ते बनावट असल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच फिर्यादी सूरज शामनानी यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेतली. अंबरनाथ पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून गुजरात राज्यात पळून गेलेला आरोपी धर्मा कच्छी याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी फसवणूक केलेल्या रक्कमेतील चार लाख रुपये रोख जप्त केले आहेत. तसेच ९३ हजार रुपये बँक खात्यात होल्ड केले. त्याचबरोबर सोन्यासारखी दिसणारी बनावट माळ तसेच ०.८०० ग्राम वजनाचे आठ हजार रुपयांचे सोन्याचे मणी जप्त केले आहेत. आरोपीने फसवणूक केलेल्या पैशांतून मुलासाठी केटीएम डुक ही महागडी दुचाकी विकत घेऊन दिली असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुचाकी लवकरच जप्त करण्यात येणार असून या प्रकरणात मोठ्या गँगचा समावेश असण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली. इतर आरोपींचा देखील शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपीवर यापूर्वी मानपाडा तसेच सेंट्रल पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश सावंत, सहायक पोलिस निरीक्षक अविनाश गायकवाड, पोलिस हवालदार दत्ता जाधव, संजय चव्हाण, पोलिस नाईक हेमंत पाटील, पोलिस शिपाई मुरलीधर गवळी, मंगेश सूर्यवंशी, आणि इतर कर्मचारी यांच्या पथकाने केली, अशी माहिती अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त काळे यांनी दिली आहे.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475