मालमत्ता कर थकबाकीदारांची ठामपाकडे एकत्रित यादी नाही

ग्राहक क्रमांक सादर करण्याचा महापालिकेचा सल्ला

ठाणे: मालमत्ता कर अदा न करणा-या थकबाकीदारांची एकत्रित यादी ठाणे महापालिकेकडे नसल्याचे निदर्शनास आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी 16 फेब्रुवारी 2023 रोजी ठाणे महानगरपालिकेकडे अर्ज करुन मालमत्ता कर अदा न करणा-या थकबाकीदारांची माहिती मागितली होती. मात्र थकबाकीदारांची एकत्रित यादी नसल्याचे धक्कादायक उत्तर महापालिकेकडून मिळाले. ही यादी न मिळाल्याने गलगली यांना मालमत्ता ग्राहक क्रमांक सादर करण्याचा विचित्र सल्ला ठाणे महापालिकेने दिला आहे.

ठाणे महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या मुख्य कार्यालयाचे कार्यालयीन उपअधीक्षक सी. एल. बेनगुडे यांनी कळविले की, ‘या विभागाचा मालमत्ता कर संलग्न अभिलेख हा प्रभाग कार्यालय, वसुली ब्लॉक क्र, घर क्रमांक, मालमत्ता क्रमांक यावर आधारभूत आहे. विचारलेली माहिती ही विस्तृत स्वरुपाची असून आपणांस आवश्यक माहितीबाबत मालमत्ता ग्राहक क्रमांक सादर करावा. तो सादर केल्यास माहिती देण्यात येईल. आवश्यक असलेल्या माहितीसाठी महापालिकेच्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि करवसुली कार्यालयात कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून अवलोकन करू शकता, असे उत्तर श्री. गलगली यांना देण्यात आले.

अनिल गलगली यांनी या उत्तराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. संगणकाच्या युगात एका क्लिकवर अशी माहिती उपलब्ध करणे शक्य असून असा अभिलेख मालमत्ता कर कार्यालयाकडे असणे आवश्यक आहे. श्री. गलगली यांनी मुख्यमंत्री आणि ठाणे महानगर पालिका आयुक्तांकडे अशी माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, जेणेकरून कर चुकविणारे लोकलज्जास्तव कर अदा करतील.