ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेतील शिपाई जितेंद्र मोरे (३५) याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्विकारताना बुधवारी रंगेहाथ पकडले आहे.
त्याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. परंतु तडजोड अंती लाचेचे दोन हजार रुपये स्विकारले.
मोरे हा ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळा विभागातील शिपाई आहे. या घटनेतील तक्रारदार यांच्या मैत्रिणीच्या मुलीच्या नावात शाळेतून झालेला बदल दुरुस्ती करण्यासाठी जितेंद्र मोरेने तक्रारदारांकडे पाच हजार रुपयांची लाचेची रक्कम मागितली. त्याबाबत १२ एप्रिल २३ रोजी तक्रार नोंदवली होती.
तक्रारदारांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने त्याच दिवशी पडताळणी केली असता, लोकसेवक यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळ्याचे आयोजन करुन जितेंद्र मोरे याला तक्रारदाराकडून मोरे याच्या कार्यालयात दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. पुढील तपास सुरु आहे.