ठाणे-बोरिवली भुयारी मार्गाचे खोदकाम होणार अजस्त्र यंत्राने

चार वर्षांनंतर टोल वसुली होणार

ठाणे : ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गाचा प्रकल्प मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण चार वर्षांमध्ये करणार असून, प्रस्तावित मार्गाचे बांधकाम हे चार टनेल बोअरिंग मशिनच्या (टीबीएम) सहाय्याने पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

भुसंपादनासाठी क्षेत्र हे एकूण ४९.४८ हेक्टर इतके आहे. यापैकी अंदाजे ३७. ६३ हेक्टर सरकार वनक्षेत्र आणि ११.९१ हेक्टर खासगी जमीन आहे, अशी माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी ‘ठाणेवैभव’ला दिली. या प्रकल्पाचा खर्च ओपन रोड टोलिंग प्रणालीद्वारे वसूल करण्यात येणार असल्यामुळे या मार्गावरही टोल वसुली होणार, हे निश्चित झाले आहे.

या मार्गिकेच्या ११.८ किलोमीटर लांबीपैकी ४.४३ किमी लांबी ही ठाणे जिल्ह्यातून आणि ७.४ किमी लांबी ही बोरिवली जिल्ह्यातून प्रस्तावित आहे. एकूण सहा गावांपैकी चितळसर, मानपाडा, माजिवाडा, व मागाठाणे – बोरिवली गावांमध्ये संयुक्त मोजणी ही थेट खरेदी पद्धतीने करण्याचे प्रस्तावित आहे. तीन उर्वरित गावे म्हणजे बोरीवडे, चेणे आणि येऊर ठाणे ही आहेत.

प्रकल्पाचा अंदाजित बांधकाम खर्च रॉयल्टी वगळून, भूसंपादनासह १६६००.४० कोटी रुपये आहे. अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) या तत्वावर आर्थिकदृष्ट्या सुसाध्य असल्याचे वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. या प्रकल्पाचे बांधकाम एकूण तीन स्तरात करण्याचे प्रस्तावित केले असून, पहिल्या टप्प्यात होणा-या कामांची अंदाजे किंमत ७,२७३ कोटी रुपये, दुसऱ्या टप्प्यात अंदाजे किंमत ७४६१ कोटी रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात सिस्टीमची खरेदी आणि स्थापना व कार्यान्वित मिळून ५३० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.

बीओटी, एचएएम आणि ईपीसी नुसार केलेल्या अभ्यासानुसार खर्चाच्या दृष्टीने प्रकल्पाकरीता मॉडेलमध्ये सर्वात कमी आहे. त्यातंर्गत एकूण बांधकाम खर्चाच्या जवळपास २० टक्के बचत होणे अपेक्षित आहे.