पाण्यासाठी ठाणेकरांचा टाहो; भाजपा काढणार लॉग मार्च

आ. संजय केळकर यांनी ठामपाला दिला १० दिवसांचा अल्टीमेटम

ठाणे: ठाणे शहरात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले असून त्यावर तोडगा काढण्याऐवजी महापालिका टँकरमाफियांना पोसत आहे. घोडबंदर परिसरात तर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने महापालिकेने नविन इमारतीना परवानगी देणे बंद करावे. येत्या दहा दिवसात पाण्याचे नियोजन न केल्यास स्वतः रस्त्यावर उतरून ठाणे महापालिकेवर लाँग मार्च काढणार असल्याचा इशारा आ. संजय केळकर यांनी दिला आहे.

ठाणे शहरातील पाणी टंचाईच्या प्रश्नावर मागील सहा महिन्यात आ. संजय केळकर यांनी अनेक आंदोलने केली. विधीमंडळातही आवाज उठवला. परंतु, परिस्थितीत फरक पडलेला नाही. या पार्श्वभूमीवर घोडबंदर भागातील पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या रहिवाशांनी बुधवारी ठाणे महापालिकेत आ.संजय केळकर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. आ. केळकर यांनी रहिवाशांसमवेत महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वस्तुस्थिती मांडली. घोडबंदर परिसरातील गृहसंकुलांसाठी ५० एमएलडी पाणी केवळ कागदोपत्री मंजुर आहे. परंतु प्रत्यक्षात अंमलबजावणीच न झाल्याने टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. घोडबंदरच्या सुमारे ३० इमारती टँकरसाठी अव्वाच्या सव्वा रक्कम मोजत आहेत.

पाण्याची इतकी टंचाई असताना महापालिका मात्र नवनवीन बांधकामांना परवानग्या देत असल्याने उच्च न्यायालयात याबाबत याचिका देखील दाखल करण्यात आली होती. त्यावर न्यायालयाने पुरेसे पाणी पुरवता येत नसेल तर, नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश दिले होते. त्यावर ठाणे महापालिकेने पुरेसा पाणी पुरवठा करू, असे प्रतिज्ञापत्र सादर केले. तरीही ठाणे शहरातील अनेक भागात आजही पाणी टंचाई असूनही पालिका बहुमजली इमारतींना परवानगी देत आहे.

शहरात ५० मजल्यांच्या १५ इमारती आणि एक ७२ मजली इमारतीला परवानगी दिली आहे. आधीच पाणी टंचाई असताना या इमारतींमधील हजारो नागरीकांना पाणी कसे पुरवणार असा प्रश्न आ.केळकर यांनी उपस्थित करून ही नवीन बांधकामे तात्काळ बंद करण्याची मागणी केली.

धरणाला पुढची १० वर्षे लागतील तेव्हा धरण-धरण करीत बसण्यापेक्षा छोटे बंधारे उभारून कल्पकतेने नियोजन करण्याची सूचना आ. केळकर यांनी केली. येत्या १० दिवसात हा परिसर टँकरमुक्त करावा, अन्यथा, स्वतः रस्त्यावर उतरून हिरानंदानी इस्टेट ते ठामपा मुख्यालय असा लाँग मार्च काढणार, असा इशारा आ. संजय केळकर यांनी दिला आहे.

दुबार नालेसफाई करा-आ.केळकर

शहरात नालेसफाईत हातसफाई केली जाते, अधिकाऱ्यांशी संगनमत करून ठेकेदार मंडळी केवळ फार्स करून बिले उकळतात. यावर अंकुश बसावा यासाठी नालेसफाईसाठी जी एकत्रित रक्कम असेल ती विभागून पावसाळ्याआधी नालेसफाई करण्याबरोबरच पुन्हा चार-पाच महिन्यांनी दुबार नालेसफाई केली पाहीजे, अशी सूचना केली असुन ती आयुक्तांनी मान्य केली आहे. योग्य नाले सफाईबाबत आदर्श नाले बांधणी प्रकल्प ही माझी संकल्पना आयुक्तांनी मांडली आहे. आमच्या जागर फाऊंडेशन या संस्थेमार्फत आणि एका विकासकाच्या पुढाकाराने त्याचे मॉडेल लवकरच पालिकेला सादर केले जाणार असल्याचे आ.केळकर यांनी स्पष्ट केले.