ठाणे: जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक झाला असून या वर्षात पहिल्यांदाच एकाच दिवशी नवीन पावणे दोनशे रुग्णांची भर पडली आहे, त्यामुळे ठाणेकरांची चिंता वाढली आहे.
महापालिका क्षेत्रात सर्वात जास्त ७७ रूग्ण ठाणे महापालिका हद्दीत सापडले आहेत. ५६ रुग्णांची भर नवी मुंबई महापालिका येथे पडली आहे. मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात १९ रुग्णांची नोंद झाली आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये आठ, उल्हासनगर येथे सात, भिवंडी महापालिकामध्ये तीन ठाणे ग्रामीण, परिसरात तीन आणि बदलापूरमध्ये दोन रूग्ण नोंदवले गेले आहेत.
जिल्ह्यात आत्तापर्यंत सात लाख ४९,७७२ रूग्ण बाधित सापडले आहेत. रुग्णालयात आणि घरी ९४२जणांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत सात लाख ३७,६१५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन गेले आहेत तर आत्तापर्यंत ११,९७७जणांचा मृत्यू झाला आहे.