आंबा महोत्सवात शेतकरी आणि ग्राहकांची होणार थेट भेट
ठाणे: प्रतिकूल हवामान, नैसर्गिक आपत्त्ती यामुळे यंदा कोकणात हापूसचे अवघे २० टक्के उत्पादन झाल्याने शेतकरी संकटात आहे तर खवय्यांनाही हापूसची चव चाखणे महागात पडणार आहे. आमदार संजय केळकर यांच्या आंबा महोत्सवाने मात्र शेतकऱ्यांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवून दिलासा दिला आहे तर ग्राहकांनाही स्वस्तात मस्त आंबे चाखण्याची संधी दिली आहे.
असह्य उकाड्यातही ठाणेकरांना यंदा आंबा महोत्सवाची धूम अनुभवता येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि कृषी पणन मंडळ पुरस्कृत तसेच संस्कार प्रतिष्ठान आणि कोकण विकास प्रतिष्ठानच्यावतीने २ ते १४ मे या कालावधीत सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत ठाण्यातील गावदेवी मैदान येथे भव्य आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. आंबा महोत्सवाचे हे यंदाचे १६ वे वर्ष आहे.
यावेळी मुख्य आयोजक आ. संजय केळकर यांच्यासमवेत कोकण विकास प्रतिष्ठानचे राजेंद्र तावडे, माजी उपमहापौर सुभाष काळे, अशोक भोईर, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठामपा परिवहन सदस्य विकास पाटील, पु.ल.देशपांडे कला अकादमीचे सदस्य मकरंद मुळे,संतोष साळुंखे आदी उपस्थित होते.
आंबा महोत्सवाच्या माध्यमातून कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांची थेट भेट होऊन लाखोंची उलाढाल होत असते. यात शेतक-यांना फायदा होतोच शिवाय, ग्राहकांनाही कोकणातील अस्सल हापूस आंबा योग्य दरात मिळतो. कोकणात १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकतो. यंदा अवकाळी पाऊस, ढगाळ हवामान आणि अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. २०२० ला ३ लाख २१ हजार मेट्रिक टन, २०२१ ला दोन लाख ५६ हजार मेट्रीक टन, २०२२ ला १ लाख २८ हजार मेट्रीक टन आंबा उत्पादन झाले आहे. यंदा अवघे २० टक्के आंबा पीक आले आहे. या संकटात शेतकऱ्याला पाठबळ देण्यासाठी आंबा महोत्सव आयोजित केला असून महोत्सवात एकुण ४० स्टॉल्स असणार आहेत. यापैकी पाच स्टॉल महिला बचत गटाकरीता असतील. असे आ. संजय केळकर यांनी सांगितले.
आंब्यांची ऑनलाईन विक्री
गावदेवी मैदानात आंबा महोत्सवात प्रत्यक्ष विक्री सोबतच ऑनलाईन विक्रीची सुविधाही उपलब्ध असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगितले. यासाठी खवय्यांनी राजेंद्र तावडे यांच्याशी ९८६९०१६०९२ आणि दिनेश मांजरेकर यांच्याशी ९८१९०९७६५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आ. केळकर यांनी केले आहे.