ठाण्यात होणार भरड धान्याचा जागर

मुख्यमंत्री आणि राज्यपाल लावणार हजेरी

ठाणे : जगभरात साजरे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या अनुषंगाने भारतीय अन्न संरक्षा आणि मानक प्राधिकरण, ठाणे महापालिका तसेच न्यूट्रीलाईट व असोकेम यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय ईट राईट मिलेट मेळावा आणि वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.

आपल्या रोजच्या आहारात भरड धान्याचा वापर व्हावा यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती प्राधिकरणाच्या क्षेत्रीय निर्देशक प्रीती चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली. ठाण्यातील गावदेवी मैदानात २९ एप्रिल रोजी हा मेळावा होणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.

ज्वारी, बाजरी, राई, राजगिरा अशा आणि इतर १५ भरड धान्याची यादी जाहीर करण्यात आली आहे. या भरड धान्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्यन आणि पोषण असल्याने आपल्या रोजच्या आहारात याचा जास्त वापर करण्यासाठी या मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांमध्ये या मेळाव्याचा माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. या मेळाव्यात खाद्यपदार्थ्यांच्या स्टॉलची देखील रेलचेल असणार आहे.

वॉकथॉनच्या माध्यमातून सुरक्षित आणि पौष्टिक आहाराविषजयी जनजागृती केली जाणार आहे. या मेळाव्याची सुरुवात पहाटे ६ वाजता योगा आणि झुंबाने होणार आहे. त्यानंतर तलावपाळी येथील स्ट्रीट फूड हबचे उदघाटन केले जाणार आहे. तर संध्याकाळी ४.३० वा भरड धान्य मेळाव्याचे उदघाटन केले जाणार आहे. या उदघाटनानंतर विविध स्पर्धा, चित्रकला, पोस्टर मेकिंग,रांगोळी,प्रश्न मंजुषा, भरड धान्य आधारित पाककृती असे उपक्रम राबवले जाणार आहे. या मेळाव्याचा समारोप सांयकाळी ६ ते ८ च्या दरम्यान होणार असून उदघाटनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावण्यात आले असून समारोपाला राज्यपाल येणार असल्याचे प्रीती चौधरी यांनी स्पष्ट केले.