ठाणेकर सनाया ठक्करला पुन्हा एकदा राज्य अजिंक्यपद

दिव्यांग खेळाडूची आंतरराष्ट्रीय झेप

ठाणे: नुकत्याच कल्याण-पलावा येथे झालेल्या शुभ जुनिअर राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेत पुन्हा एकदा दिव्यांग खेळाडू सनाया ठक्कर हिने अजिंक्यपद पटकावण्याची कामगिरी केली आहे. २०२२-२३ या वर्षात देखील तिने दोन्ही राज्य अजिंक्यपद स्पर्धेत १३ वर्षाखालील गटात दुहेरी तसेच एकेरीमध्ये देखील पदक पटकावले होते.

सुरवातीच्या सामन्यात एकहाती विजय मिळवून सनायाने विधी सैनी हिला साथीला घेत उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीत त्यांचा सामना अनन्या पटवर्धन आणि सिया शिरसाट या जोडीसोबत होता. या सामन्यात २१-६, २१-८ असे सहज नमवून त्यांनी अंतिम फेरी गाठली . अंतिम फेरीच्या सामन्यात प्रिया आंबुर्ले आणि समीक्षा मिश्रा या जोडीला २१-१०, २१-६ असे एकहाती नमवून सनायाने सुवर्ण पदकाची सुनिश्चीती केली.

ठाणे बॅडमिंटन अकादमीमध्ये दिव्यांग खेळाडूंना देखील विशेष प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्यासाठी स्वतंत्र सराव सत्र तयार केले जाते. आतापर्यंत अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करणारे दिव्यांग बॅडमिंटनपटू या प्रशिक्षण योजनेने घडविले आहेत. त्यात गिरीश शर्मा आणि आरती पाटील यांचा प्रामुख्याने सहभाग आहे. आता हीच परंपरा ठाणे अकादमीचा यश सावर्डेकर याने कायम ठेवली आहे.

जन्मापासून कर्णबधिर असणाऱ्या यशने लहानपणापासून अनेक अडचणींचा सामना केला आहे. खेळाडू म्हणून स्वतःला घडवताना त्याने अत्यंत मेहनत करीत अनेक राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी केली आहे. फेब्रुवारी माहित्यात मध्य प्रदेश येथे पार पडलेल्या २५व्या नॅशनल डेफ स्पोर्ट्स चॅम्पिअनशिपमध्ये यशने आपल्या चमकदार कामगिरीने आणि उत्तम खेळीने सर्वांनाच दखल घेण्यास भाग पाडले. सुरुवातीचे सामने एकहाती जिंकत त्याने ब्रॉन्झ पदकापर्यंत मजल मारली आणि त्याचीच फलश्रुती म्हणून १६ ते २५ जुलै २०२३ मध्ये ब्राझील येथे होणाऱ्या पुरुष एकेरीमध्ये तिसऱ्या वर्ल्ड डेफ युथ आणि सहाव्या वर्ल्ड डेफ ओपन चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी ठाणेकर दिव्यांग बॅडमिंटनपटू यश सावर्डेकर याची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी यश कसून सराव करीत आहे. त्याच्यासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड आणि संपूर्ण टीम यांनी स्वतंत्र प् कार्यक्रम तयार केला असून सध्या चालू असलेल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरात त्याची उत्तम अंमलबजावणी होत आहे.