ठामपाच्या तिजोरीला दिला अनुदानाने हात

* वर्ष अखेरीस २६८४ कोटी जमा
* अनुदानापोटी ९०१ कोटी प्राप्त
* जीएसटीकडून ९७९ कोटी
* स्टॅम्प ड्युटीने दिले १६६ कोटी

ठाणे : सरलेल्या वर्षात विविध विभागांनी कर वसुलीच्या माध्यमातून ठाणे महापालिकेचे उद्दिष्ट जवळपास गाठले आहे. ९४ टक्के महसुली उत्पन्न मिळवलेल्या महापालिकेला अनुदान, जीएसटी आणि स्टॅम्प ड्युटीने हात दिल्याने आर्थिक स्थिती भरभक्कम झाली आहे.

वर्ष अखेर पालिकेच्या तिजोरीत सुधारीत अंदाजाच्या म्हणजेच २७८५ कोटीपैकी २६८४ कोटींची समाधानकारक वसुली झाली. त्यातही शासनाकडून ९०१ कोटींचे अनुदान पालिकेला प्राप्त झाल्याने विकास कामांना त्याचा हातभार लागला. याशिवाय जीएसटीपोटी ९७९ कोटी आणि स्टॅम्प ड्युटी पोटी १६६ कोटी पालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहेत.

पालिकेच्या मुख्य मालमत्ता कर विभागाने ७२२ कोटी वसूल केले. स्थानिक संस्था कर ४.२८ कोटी मिळाले. शहर विकास विभागाला ५८५ कोटींचे मुळ अंदाज प्रस्तावित करण्यात आले होते. त्यानंतर ते सुधारीत करीत ४५८ कोटींचे करण्यात आले. वर्ष अखेर या विभागाने ४४१ कोटींची वसुली केली. पाणी पुरवठा विभागाने १२५ कोटी, जाहीरात विभाग आठ कोटी, अग्निशमन १२५ कोटी, वृक्ष प्राधिकरण ४.२८ कोटी आदी महत्वाच्या विभागांनी यंदा बऱ्यापैकी वसुली केली आहे.

महापालिकेला जीएसटी पोटी वर्ष अखेरीस ९७९ कोटी, तर स्टॅम्प ड्युटी पोटी १६६ कोटी मिळाले आहेत. शिक्षक वेतन व पेन्शन अनुदान ५१ कोटी, इतर अनुदाने ८४७ कोटी आदी अनुदाने पालिकेला मिळाल्याने पालिकेची तिजोरी बऱ्यापैकी सावरली आहे.

महापालिकेचे उत्पन्न आणि उद्दीष्ट
विभाग – उद्दीष्ट (कोटी) – वसुली (कोटीत)
मालमत्ता – ७३४ – ७२२
शहर विकास – ४५८ – ४४१
पाणी पुरवठा – १६० – १२५
सार्वजनिक बांधकाम – ४५.६० – ४४.२२
अग्निशमन – १२९.०५ – १२५
स्थावर – १७.१० – ७.४१