खोटा दाखला देणाऱ्या डॉक्टरसह सहा जणांना अटक
भाईंदर: भाईंदरजवळील घोडबंदर येथील चेना गावातील जंगलात रानडुकराच्या बेकायदेशीर शिकारीसाठी गेलेल्या टोळीतील एका सदस्याकडून झालेल्या गोळीबारात एका ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
विजय सापटे असे मृत व्यक्तीचे नांव असून, ते मीरा-भाईंदर महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होते. या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे, गोळी लागून मृत्यू झाला असतानाही पोलिसांना कोणतीही माहिती न देता एका खाजगी डॉक्टरच्या मदतीने खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनवून मृतदेहावर घाईघाईने परस्पर अंत्यसंस्कार उरकण्यात आले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवार, १९ ऑक्टोबरच्या मध्यरात्री चेना गावातील ५ ते ६ जणांचा गट रानडुकराची बेकायदेशीर शिकार करण्यासाठी बंदुका व छर्रे घेऊन जंगलात गेला होता. जंगलात फिरत असताना मध्यरात्रीच्या सुमारास अंधारात एका बॅटरीचा प्रकाश चमकला. हा प्रकाश म्हणजे वन्यप्राण्याचे चमकणारे डोळे आहेत, असा गैरसमज शिकारी गटातील एका साथीदाराने केला आणि त्या दिशेने थेट गोळी झाडली. दुर्दैवाने ही गोळी थेट विजय सापटे यांच्या छातीत लागली आणि ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. या घटनेत कल्पेश ढगळा आणि कुणाल शेलार जखमी झाले आहेत.
गोळी लागून विजय सापटे यांचा मृत्यू झाल्यानंतर कायदेशीर कारवाईच्या भीतीने संपूर्ण गट घाबरला. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना किंवा वनविभागाला देण्याऐवजी गुन्हा दडपण्याचा कट रचला. त्यांनी सुरुवातीला जखमींना रुग्णालयात दाखल करताना नदीत मासेमारी करताना स्फोट झाल्याचा खोटा बनाव रचला. त्यानंतर, त्यांनी मीरा रोड परिसरातील एका खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टर राजेश पालांडे यांच्याशी संपर्क साधला. कथित स्वरूपात प्रत्यक्ष तपासणी न करता किंवा व्हिडिओ कॉलच्या आधारे या डॉक्टरने विजय सापटे यांचा मृत्यू जंगलातील गोळीबारात नव्हे, तर घरीच हृदयविकाराच्या झटक्याने (हार्ट अटॅक) झाल्याचे खोटे मृत्यू प्रमाणपत्र लिहून दिले. या खोट्या दाखल्याच्या आधारे पोलिसांनी संशय घेऊ नये म्हणून मंगळवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास मृतदेहावर परस्पर अंत्यसंस्कारही उरकण्यात आले.
या संशयास्पद घटनेची माहिती मिळताच काशीगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील आणि मीरा-भाईंदर गुन्हे प्रकटीकरण शाखा-१ च्या पथकाने तातडीने चक्र फिरवली. जंगलात तपास केला असता पोलिसांना घटनास्थळापासून ४५० मीटर आत रक्ताचे डाग आणि शिकारीचे साहित्य आढळून आले.
पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणात पोलिसांनी हलगर्जीपणा आणि बनावट प्रमाणपत्र देणारे डॉ. राजेश पालांडे यांच्यासह महेश गायकर व अन्य साथीदारांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये मृत व्यक्तीच्या मुलाचाही समावेश असल्याचे समजते. पोलिसांनी गुन्हा वापरलेली बंदूक जप्त केली असून वनविभागाकडूनही वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.