प्राधिकरणासाठी ठाण्यासाठी स्वतंत्र सीईओ
ठाणे: ठाण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी नागरीकांना मुंबई येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. ठाणेकरांची ही पायपीट आता संपणार असून राज्य सरकारने अखेर वेगळे मुंबई महानगर विभाग झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण स्थापन केले आहे. त्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी पराग सोमण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई ठाणे या ठिकाणी झोपडपट्टी विकास करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण होते. तेथे या परिसरातील झोपडपट्टी विकासाची प्रकरणे मंजूर केली जात होती, परंतु मुंबई परिसरातील नियम ठाण्याला लागू नव्हते, त्यामुळे अनेक प्रकरणे मार्गी लावण्यासाठी ठाणेकरांना मुंबईला हेलपाटे मारावे लागत होते. ठाणे आणि एमएमआर विभागाकरिता वेगळे प्राधिकरण करण्याची मागणी होत होती. राज्य सरकारने ती मागणी मान्य करून ठाण्यात प्राधिकरण स्थापन केले होते. परंतु ठाणे आणि मुंबईकरिता एकच सीईओ असल्याने कामे मार्गी लावताना विलंब होत होता. मुंबई प्राधिकरण परिसरातील झोपडपट्टीचा विकास देखिल प्राधिकरणामार्फत करण्याची मागणी केली जात होती. ती मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजूर करून मुंबई वगळता मुंबई महानगर प्राधिकरणाकरिता वेगळे झोपडपट्टी प्राधिकरण करण्यासाठी मान्यता देऊन त्यासाठी पराग सोमण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री. सोमण हे औरंगाबाद विभागीय कार्यालयात उपायुक्त (महसूल विभाग) होते. त्यांची नुकतीच आयएएसपदी बढती झाली आहे. त्यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर काम केले आहे. उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी आदी कामांचा त्यांना अनुभव आहे. अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथे काम केले आहे.
ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेल, भिवंडी, मीरा-भाईंदर, वसई-विरार या भागातील झोपडपट्टीचा विकास जलद गतीने होईल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. ठाणे शहरातील रखडलेले प्रकल्प लवकर मार्गी लागतील, असा विश्वास झोपडपट्टी पुनर्वसन योजना सुरु असलेल्या भागातील नागरिकांनी व्यक्त केला आहे.
महविकास आघाडी सरकार असल्यापासून मी याबाबत मागणी करत होतो. अधिवेशनातही वारंवार ही चर्चा मी घडवून आणली होती. आता महायुतीचे सरकार आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याने माझ्या पाठपुराव्याला यश आले आहे. त्यामुळे ठाण्यातील एसआरए योजना तातडीने मार्गी लागणार आहेत, असे
आ.संजय केळकर यांनी सांगितले.