ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची केली मागणी
वाडा: वाडा तालुक्यातील भिवंडी- वाडा-मनोर, कुडूस ते देवघर, कोंढले ते खैरे, सापरोंडे ते उचाट, डाकिवली ते चांबळे आदी रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली असून वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमान संघटना आणि महायुतीच्या वतीने कुडूस नाका येथे आज रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संतापलेल्या कार्यकर्त्यांनी सुमारे दोन तास रास्ता रोको आंदोलन करून महामार्ग रोखून धरला होता.
या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमान संघटनेचे पालघर जिल्हाध्यक्ष जितेश पाटील आणि शिंदे गट शिवसेनेचे नेते सचिन पाटील यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन कुडूस परिसर दणाणून सोडला होता.
भिवंडी- वाडा- मनोर या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या वर्षभरात 58 कोटी 73 लाखांचा खर्च करून देखील अतिशय निकृष्ट आणि धोकादायक रस्ता बनला आहे. रस्त्याचे काम अजुनही अपूर्ण अवस्थेतच असून जागोजागी पडलेल्या मोठ-मोठ्या खडड्यांमळे तलावाचे स्वरूप आले आहे. या रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले असुन सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. आजपर्यंत झालेल्या अपघातांना बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांना जबाबदार धरून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करावेत आणि रस्त्याच्या दुरावस्थेस जबाबदार असणा-या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याची चौकशी करावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी लावून धरली.
या आंदोलनात शिंदे गट शिवसेनेचे नेते सचिन पाटील, भाजपाचे योगेश पाटील, श्रमजिवी संघटनेचे नेते प्रमोद पवार, नितीन जाधव, देवा ग्रुपचे तानाजी मोरे, निलेश पाटील आदींनी आपली मनोगते व्यक्त केली.